संजय कुळकर्णी
मुंबई : व्यावसायिक नाट्यसृष्टी दरवर्षी दीनानाथ मंगेशकर पारितोषिकाची चातकासारखी वाट पाहते. व्यावसायिक नाटकांना प्रतिवर्षी दीनानाथ पारितोषिक देऊन मंगेशकर कुटुंबीय त्यांना सन्मानित करीत आलेली आहे. निर्मात्यांत त्या पारितोषिकांसाठी स्पर्धा असायची. गेल्या लॉकडाऊनमुळे ती पारितोषिकं दिली गेली नाहीत. यंदा दीनानाथ मंगेशकर पारितोषिक जाहीर झाली, पण त्यात सर्वोत्कृष्ट नाटकाची निवड केली गेली नाही. त्यामुळे यंदा प्रथमच व्यावसायिक नाट्यसृष्टी दीनानाथ मंगेशकर पारितोषिकापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर थोड्याफार प्रमाणात उदासीनता पसरलेली आहे.
दीनानाथ मंगेशकर पारितोषिकांच्या वेळी ज्येष्ठ नाट्य निर्माते मोहन वाघ यांची प्रकर्षाने आठवण येते. कारण पारितोषिक देण्यास जेव्हापासून सुरुवात झाली, तेव्हापासून ते निगडित होते. शिवाजी पार्क येथील जीप्सी हॉटेलात पत्रकार परिषदेचे आयोजन केले जात असे. त्यांच्या निधनानंतर ती पत्रकार परिषद प्रभुकुंज या मंगेशकर कुटुंबियांच्या घरी आयोजित होत आहे. यंदा त्या पारितोषिकात नाटक नाही, हे अनेकांना खटकलं. दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत रंगभूमीवरील संगीतकार आणि गायक नट म्हणून अतुलनीय, प्रेरणादायी योगदान आहे. ३१ वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान स्थापन केले आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील मान्यवरांना सन्मानीत करण्याचा विडा उचलला. नाटकासाठी ५० हजार रोख आणि सन्मानचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहन वाघांच्या बहुतांशी नाटकांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झाले होते. व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांना कुठलेही पारितोषिक मिळाले, की त्याचे बुकिंग वाढते, असा निर्मात्यांनी समज करून घेतलेला आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा व्यावसायिक नाट्यसृष्टीत मोठा मानला जातो.
गेली दोन वर्षे लॉकडाऊनच्या वातावरणात गेले. नाट्य प्रयोग बंद होते. लॉकडाऊन शिथिल झाला, की प्रयोग सादर होत होते. व्यावसायिक नाटकांची प्राथमिक राज्य स्पर्धा झाली आहे. अंतिम फेरी बाकी आहे. तसेच इतर वाहिन्यांनी त्यांची पारितोषिकं नाटकांना दिली आहेत. त्यामुळे झुंड, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, आमने सामने, हिमालयाची सावली, व्हॅकूम क्लीनर, तिसरे बादशहा हम, महारथी इत्यादी नाटकांतून परीक्षकांना दीनानाथ मंगेशकर पारितोषिकासाठी नाटकाची निवड करता आली असती असे जाणकारांना वाटते. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीय अजूनही नाटकाची त्या पुरस्कारासाठी निवड करू शकतात आणि त्यामुळे पारितोषिकापासून निर्माता हा वंचित होणार नाही.