मुंबई : एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली, तरी आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निश्चय माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाने केपीएमजी संस्थेची नेमणूक केली आहे. खासगीकरण करायचे की उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधायचे, याचा सल्ला ही संस्था देईल. त्यानंतर पावले उचलली जातील, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर आता मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.