रांची (वृत्तसंस्था) : मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलसह (२५-२) अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनच्या (१९-१) अचूक माऱ्यामुळे रांचीतील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (जेएससीए) आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने दुसऱ्या टी-ट्वेन्टी लढतीत शुक्रवारी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांवर रोखले.
किवींच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी दोन आकडी धावा जमवल्या. मात्र, सर्वाधिक धावा चौथ्या क्रमांकावरील ग्लेन फिलिप्सच्या आहेत. त्याने २१ चेंडूंत ३४ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. फिलिप्सनंतर सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिचेलचे (प्रत्येकी ३१ धावा) सर्वाधिक योगदान आहे. पहिल्या लढतीत खातेही खोलू न शकलेल्या मिचेलला सूर गवसला. दुसरीकडे, अनुभवी ओपनर गप्टिलने सातत्य राखले. या जोडीने झटपट सुरुवात करताना ४.२ षटकांत ४८ धावांची सलामी दिली.
मात्र, मध्यमगती दीपक चहरने गप्टिलला यष्टिरक्षक रिषभ पंतद्वारे झेलचीत करताना सलामी फोडली. त्याच्या १५ चेंडूंतील ३१ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मिचेलने एक बाजू लावून धरली तरी त्याला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. हर्षलने त्याची विकेट घेतली. आघाडीच्या फळीत मार्क चॅपमनला (२१ धावा) मोठी खेळी करता आली नाही. मात्र, फिलिप्सने न्यूझीलंडला दीडशेपार नेण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावताना एक चौकार तर तीन षटकार मारले.
आघाडी फळीने थोडा प्रतिकार केला तरी हर्षलसह अश्विनने धावांना आळा घातला. हर्षल पटेलने ४ षटकांत २५ धावा देत सर्वाधिक २ विकेट घेतल्या. अश्विनने ४ षटकांत केवळ १९ धावा मोजताना एक विकेट घेतली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली तरी तो महागडा ठरला. दीपक चहरनेही एका विकेटसाठी ४२ धावा मोजल्या. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने (२६-१) थोडा प्रभावी मारा केला.
यशस्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण
दुसऱ्या टी-ट्वेन्टी लढतीद्वारे मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने त्याला पदार्पणाची कॅप दिली. हर्षलने आयपीएलच्या शेवटच्या हंगामात पर्पल कॅप मिळवली होती.