Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव द्या

उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव द्या

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर मानखुर्द लिंक रोड रस्त्यावरील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर न झाल्यास भाजप सभागृह चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी भाजप आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेनेकडून अद्यापही प्रस्ताव प्रलंबित आहे. गेले अनेक महिने भाजपकडून याबाबत सतत पाठपुरावा केला जात आहे. याबाबत महापौरांना पत्रव्यवहारही केला गेला होता. मात्र अद्यापही सत्ताधाऱ्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.

दरम्यान, ३० जुलै २०२१च्या कार्यक्रम पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरणाचा प्रस्ताव असून गेले ४ महिने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असून वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला आहे. असे असतानादेखील नामकरणाच्या प्रस्तावावर दिरंगाई होताना पहायला मिळाली. त्या प्रस्तावानंतर इतर प्रस्ताव मंजूर झाले, मात्र नामकरणाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने भाजप आक्रमक झाली आहे.

२० महिन्यांनंतर प्रत्यक्ष सभा

दरम्यान सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी कोरोनानंतर पहिली प्रत्यक्ष सभा होणार आहे. ही सभा तब्बल २० महिन्यांनंतर होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन सभा सुरू होत्या, मात्र आता प्रत्यक्ष होणाऱ्या सभेत उड्डाणपुलाचा प्रस्तावदेखील येणार आहे. प्रशासनाने नामकरणाच्या प्रस्तावावर पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नामकरणाचा प्रस्ताव योग्य नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. तेच स्पष्टीकरण पुन्हा देण्यात आल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment