मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मिडब्रेन ऍक्टिव्हेशनचा भांडाफोड करण्यात आला. पत्रकार भवनात आलेल्या पत्रकारांसमोर डोळ्यांवर पट्टी बांधून स्वप्निल शिरसाठ यांनी वस्तू ओळखून दाखवल्या तसेच त्यांच्या ओळखपत्रावरील नाव वाचून दाखवले अन् त्यानंतर ते कसे ओळखले याची उकलही करून दाखवली. यावेळी नरेंद्र दाभोळकर यांची मुलगी मुक्ता दाभोळकर यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
मेंदूचे उद्दीपन केल्याने डोळ्यांनी न बघता ही वस्तू ओळखणे, धडाधडा वाचन करणे, स्पर्शाने, घानेंद्रियाच्या माध्यमाने वस्तू कोणती आहे ते सांगणे, अशा प्रकारच्या गोष्टी सहज शक्य होतात असा दावा मिडब्रेन ऍक्टिव्हेशन करणाऱ्या संस्था करताना दिसतात. मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो, असेही मिडब्रेन अॅक्टिव्हेशन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. आपल्या मुलांची कुशाग्र बुद्धिमत्ता व्हावी तो हुशार व्हावा असे सर्व पालकांना वाटते आणि त्याचमुळे बक्कळ पैसे खर्च करून महागडे क्लासेस लावले जातात.मिडब्रेन ऍक्टिव्हेशन ची फी देखील खूप आहे आणि एवढे पैसे मोजुन ही मुलांना हे काय शिकवतात…? खोटं बोलायला. एका बाजूला चांगले संस्कार देण्यासाठी पालक धडपड करतात आणि दुसऱ्या बाजूला मुलांना खोटं बोलायला लावुन कावेबाज पवित्रा घेतात.
डोळ्यांवर पट्टी बांधुन वाचता येणं अशक्यच असते तरी तसे करणाऱ्या व्यक्तीला ते दिसते म्हणूनच तो वाचू शकतो. म्हणून पालकांच्या तसेच इतर संबंधित व्यक्तीच्या दबावाने ही मुले खोटं बोलून मिडब्रेन ऍक्टिव्हेशन किती समर्पक आहे हे सांगताना दिसतात आणि हेच चुकीचे आहे. शालेय जीवनात आपण कसे बघू शकतो हे आपण शिकलो. त्यात प्रकाश जेव्हा सभोवतालच्या वस्तूवर पडतो त्यानंतर तो प्रकाश डोळ्यांवर पडुन रिफ्लेक्ट होतो त्यामुळे आपण ती बघू शकतो. त्याचमुळे जर डोळे उघडे असतील तरच प्रकाश हा रिफलेक्ट होईल ह्याचा अर्थ ही मिडब्रेन ऍक्टिव्हेशन ची प्रक्रिया करत असताना प्रयोग करत असताना डोळे उघडे असल्याने ती बघता येऊ शकते. त्यामुळे अशा दिशाभूल करण्याऱ्या गोष्टींना पालकांनी समर्थन न देता आपल्या मुलांना अशा ठिकाणी पाठवू नये, असे शाहीर स्वप्निल शिरसाठ यांनी सांगितले.