मोनिश गायकवाड
भिवंडी : मागील बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी चालक-वाहक यांच्या संपाला बारा दिवस पूर्ण झाल्याने शुक्रवारी भिवंडी एसटी चालक वाहक आंदोलक यांच्या वतीने भिवंडी बस आगार परिसरात राज्य सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मागील बारा दिवसांपासून आंदोलन राज्यभर सुरू आहे. या आंदोलनात अनेक बस चालक व वाहक यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या परिवहन मंडळाकडून अनेकांना निलंबनाच्या नोटीस सुद्धा देण्यात आल्या. या निलंबनाच्या नोटीसीला न घाबरता त्यांनी आपला हा लढा सुरू ठेवला आहे. या निषेधार्थ शुक्रवारी भिवंडी बस आगार या ठिकाणी बस आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी श्राद्ध घालून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
भिवंडी एसटी चालक वाहक यांनी राज्य सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले व या आंदोलनाला अनेक संघटना पक्ष यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राज्य सरकारने आमच्या कुटुंबीयांचा विचार करावा. मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारात नोकरी करून आपला संसार हाकत आहोत. सरकारनेही आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया आंदोलक सचिन गोडेवर यांनी प्रहारला दिली आहे.