
नाशिक : त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये हिंसाचार पेटला. यामागची पाळेमुळे खणून काढली जात आहेत. पोलिसांनी मालेगाव दंगलीप्रकरणी रझा अकदमीच्या कार्यालयावर मध्यरात्री छापे टाकले होते. त्यात महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजते. हे पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
सीसीटीव्हीचे चित्रण पाहून आरोपींचा शोध सुरू आहे. रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी ५२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणीच्या मूळ सूत्रधाराचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. त्याला लवकर बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर (१७ नोव्हेंबर, बुधवार) मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
मालेगावातील रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा यांनी बंद पुकारला होता. हजारोंच्या संख्येने रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठा हिंसाचार झाला. दुकाने जाळली. दगडफेक आणि तोडफोडीत लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी केवळ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजपकडून सातत्याने होत होती. पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक आमदारही प्रश्न उपस्थित करत होते. त्यानंतर आज मध्यरात्री पोलिसांनी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली.