माथेरान (वार्ताहर) : माथेरानमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून दस्तुरी येथील काळोखीच्या भागातील अति चढावाच्या ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक केवळ दोन महिन्यांत गुळगुळीत झाल्यामुळे त्यावरून घसरून पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
सुरुवातीलाच या चढावाच्या जागेचा भाग कमी करावा, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकते, याबाबत स्थानिकांनी अनेकदा एमएमआरडीए अधिकाऱ्यांना समक्ष जागेवर बोलावून सूचित केले होते; परंतु याकडे कानाडोळा करत सदर कामे जलदगतीने पूर्ण करण्यात आली होती. त्यातच जे ब्लॉक या रस्त्याला लावण्यात आलेले आहेत. त्यावर मातीचा मुलामा आणि खाली सिमेंट असल्याने वरच्या भागातील मातीचे आवरण निघून जात आहे. या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर जवळपास सर्व मिळून एक हजार घोड्यांची रेलचेल सुरू असते. पर्यटक तसेच पादचारी आणि हातरिक्षासुध्दा याच काळोखीच्या मार्गे येत असतात. त्यामुळेच हे ब्लॉक अल्पावधीतच झिजून गेल्याने गुळगुळीत
झालेले आहेत.
त्याचप्रमाणे, घोड्यांच्या पायाला लोखंडी नाल असल्याने ते अशा रस्त्यावरून घसरतात आणि अपघात होत आहेत. वैष्णोदेवीच्या ठिकाणी जे घोडे पर्यटकांची वाहतूक करतात, त्या भागात घोड्यांच्या पायाला लोखंडी नालाऐवजी रबराचे आवरण असते. त्यामुळे तेथील घोडे घसरून पडत नाहीत. आगामी काळात माथेरानमधील सर्वच पॉईंट्सकडे जाणारे रस्तेसुद्धा धूळविरहित आणि पावसाळ्यात मातीची धूप होऊ नये, यासाठी अशाप्रकारे क्ले पेव्हर ब्लॉकचे करण्यात येणार आहेत. त्यामुळे घोड्यांच्या सुरक्षेसाठीसुध्दा वैष्णोदेवी येथील घोड्यांप्रमाणे पायाला रबराचे आवरण लावल्यास घोडे घसरून पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तूर्तास, ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत, त्या जागी उत्तम दर्जाचे शासनाच्या सुयोग्य परीक्षणातील ब्लॉक मागवण्यात यावेत, अशी मागणीसुध्दा जोर धरू लागली आहे.
…तर घोडे पडण्याचे प्रमाण कमी होईल
घोड्यांच्या पायाला लोखंडी नाल असल्याने ते अशा रस्त्यांवरून घसरतात आणि अपघात होत आहेत. वैष्णोदेवीच्या ठिकाणी जे घोडे पर्यटकांची वाहतूक करतात, त्या भागात घोड्यांच्या पायाला लोखंडी नालऐवजी रबराचे आवरण असते. त्यामुळे तेथील घोडे घसरून पडत नाहीत. घोड्यांच्या सुरक्षेसाठी वैष्णोदेवी येथील घोड्यांप्रमाणे पायाला रबराचे आवरण लावल्यास घोडे घसरून पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.