अनिकेत देशमुख
भाईंदर : येणाऱ्या २०२२ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसून, स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
मीरा-भाईंदर शहरात गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व पक्षाचे इतर मोठे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाईंदर पूर्वच्या महेश्वरी भवन येथे आयोजित कार्यक्रमाकरिता चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती.
कार्यकर्त्यांशी बोलताना पाटील यांनी सांगितले की, भाजप पक्ष पूर्णपणे एकत्रीत व एकजुटीचा पक्ष आहे व येणारी मनपा निवडणूक जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल. या कार्यकर्ता संमेलन कार्यक्रमात प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष व मीरा-भाईंदर प्रभारी मिहिर कोटेचा त्याचबरोबर नगरसेवक उपस्थित होते.
कार्यकर्ता संमेलन कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
गुरुवारी सकाळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली. काशीमीरा चौक येथे त्यांच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांची चंद्रकांत पाटील यांनी प्रशंसा केली.
येणाऱ्या काळात भाजप पार्टी चांगले काम करत महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे भाजप येणारी निवडणूक स्वबळावर लढवेल आणि जिंकेल, असा विश्वास रवी व्यास यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना दिला आहे.