केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला फटकारले
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात काही भागात झालेल्या दंगलीचे खापर भाजपवर कशाला? महाविकास आघाडी सरकार कायम पळवाटा शोधत असते. त्यामुळे अमरावती, नांदेड, मालेगाव आणि परभणी येथे उळललेल्या दंगली तसेच बिघडलेल्या कायदा आणि सुव्यव्स्थेची जबाबदारी घेण्यास कचरत आहे, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला फटकारले आहे.
त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र धगधगतोय, त्याचं खापर भाजपवर फोडण्याचं कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत, असे राणे यांनी म्हटले. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंगळवारी राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
विकासामध्ये राजकारण आणल्यास पळता भुई थोडी होईल
विकासाच्या कामात मला खोडा घालायचा नाही. मी या विषयावर कधी बोललो नाही. आजही बोललो नाही. आधी मेडिकल कॉलेजला ज्या गोष्टी लागतात त्या पुरवा आणि मग बोला. विकासामध्ये राजकारण आणल्यास पळता भुई थोडी होईल, असा इशारा केंद्रीयमंत्री राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.मला नियम माहीत आहे. माझा जो मुद्दा असेल तो जिल्ह्याच्या विकासाचाच असेल. सरपंच, जिल्हापरिषद सदस्य म्हणून प्रवेश केल्यास २५ ते ५० लाख निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. जिल्हा नियोजनाचा निधी पक्ष प्रवेशासाठी वापरता येतो काय, असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्री सामंत यांना केला. २५ किंवा ५० लाख रुपये दिवून कुठच्याही सदस्यला प्रलोभन जिल्हा नियोजन मधून देता येणार नाही, असे राणे यांनी सांगितले.
सरकारने परत घेतलेले ४३ कोटी परत मिळावेत
राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन सभेत ठराव सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून कोरोनाचा काळ व शासनिर्णयांच्या तांत्रिक अडचणीमुळे खर्च न झालेला ४३ कोटी रुपयांचा विकास निधी परत मिळावा अशी विनंती राज्य सरकारकडे करा. तसा ठराव सभागृहात मंजूर करा, अशी सूचना राणे यांनी केली. हा निधी परत मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, अशी पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली. त्यानंतर ठराव एकमुखी मंजूर केला. निधी खर्च न करण्यात किंवा परत न करण्यात जि.प अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा पदाधिकारी जबाबदार नाहीत असा खुलासाही पालकमंत्र्यांना करावा लागला. ९ महिन्यांनी मंगळवारी झालेली जिल्हा नियोजन समितीची सभा शांततेत झाली.
आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार
राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, असे राणे म्हणाले.
‘कुडाळचे आमदार आणि पालकमंत्र्यांनीच विकासकामे रोखली’
कुडाळचे आमदार आणि पालकमंत्र्यांनी वागदे ओसरगावमध्ये विकासकामे रोखली, असे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये सुनावली. वागदे ओसरगावमध्ये सुचवलेली कामे कुडाळ, मालवणचे आमदार थांबवतात. हे योग्य आहे का? पालकमंत्र्यांनी त्या पत्राला स्वतःचे पत्र जोडून काम थांबवा, असे आदेश दिले. आता त्या दोन गावातील लोक गेटवर येऊन आंदोलन करत आहेत. तुम्हीच त्यांना काय ते उत्तर द्या? कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी अशी पत्रे देणे थांबवावीत आणि आपल्या मतदारसंघात जी कामे प्रलंबित आहेत ती प्राधान्याने करावीत, असे नितेश राणे पुढे म्हणाले.
५०० पानी मागणी असलेल्या कामात १२२ कामे खासदार विनायक राऊतांची आहेत, असा आरोप आमदार नितेश राणे यांनीं एका विषयावर बोलताना केला.