Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयअग्रलेख‘सी-६०’ तुकडी ठरतेय नक्षलींचा कर्दनकाळ

‘सी-६०’ तुकडी ठरतेय नक्षलींचा कर्दनकाळ

गडचिरोलीच्या जंगलात नक्षलविरोधी कारवाईत नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ तुकडीने २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीसगडच्या जंगलातून काही नक्षलवादी गडचिरोलीला जात असल्याची माहिती पोलिसांच्या कमांडो टीमला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला आहे. त्यासह २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाच्या जवानांनी शनिवारी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यामध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. या नक्षलवाद्यांमध्ये २० पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सी-६०’ युनिटचे हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे. गेले काही महिने नक्षलग्रस्त भाग शांत होता. मात्र, हे वरवरचे चित्र होते. नक्षली काही तरी मोठा प्लान आखण्याच्या तयारीत होते, हे ‘सी-६०’ तुकडीच्या कारवाईने अधोरेखित झाले आहे.

भारतात माओवाद किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये साठीच्या दशकात झाली होती. माओवाद्यांना नक्षलवादी असेही म्हणतात. सत्तरीच्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. देशाच्या ११ राज्यांतील ९० जिल्ह्यांत ही चळवळ पसरली असून नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षांत आतापर्यंत सहा हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या नक्षली कारवाईमागे पोलिसांच्या रणनितीतील बदल महत्त्वपूर्ण ठरला आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बदलण्यात आलेल्या धोरणानुसारच शनिवारची कारवाई झाली. हा बदल म्हणजे, काही वर्षांपर्यंत स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर माओवाद्यांना देत असत, आता ते पोलिसांना माओवाद्यांचा ठावठिकाणा सांगतात. सशस्त्र संघर्षांमध्ये गुप्तवार्तेला प्रचंड महत्त्व असते. माओवाद्यांविरोधातल्या लढाईत स्थानिक लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांना आता चांगली फळं मिळू लागली आहेत. गडचिरोलीतला पोलिसांच्या बाजूनं झुकलेला कल यातून दिसतो, त्यामुळे अचूक आणि नेमकी माहिती, नक्षलवाद्यांचे घटतं मनोबल आणि त्यांच्यातल्या मतभेदामुळे मोहीम यशस्वी झाली, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी आवर्जून सांगतात. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांविषयीचं प्रेम ते भ्रमनिरास, एकेकाळी ज्या भागात ते मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला सुरक्षा दलांच्या कारवाईचा दबदबा, पुनर्वसनाच्या आकर्षक योजना अशा अनेक कारणांमुळे माओवादी सशस्त्र मार्ग सोडत आहेत. त्याचबरोबर, बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिल्ह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.

गेल्या काही वर्षांतल्या अटक सत्रांमुळेही महाराष्ट्रात नक्षली चळवळीला मोठा फटका बसला आहे, असे कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) मध्यवर्ती समितीच्या कागदपत्रांमधील नोंदीत आढळले आहे. देशभरात चळवळीची स्थिती गंभीर असली तरी सर्व राज्यातील परिस्थिती समान नाही. दंडकारण्यामध्ये प्रभाव क्षेत्र कमी होत आहे. पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या (एलपीजीए) प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार दोन्ही कमी झाले आहेत. पक्ष आणि यांच्यात वाढती दरी, कमी होत असलेली नवीन सदस्यांची भरती आणि एलपीजीए सोडून जाणाऱ्यांची वाढती संख्या, या सगळ्यांमुळे चळवळीला कठीण काळाचा सामना करावा लागतो आहे, असे त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे.

गडचिरोलीमध्ये नक्षलींचा मोठ्या प्रमाणात खात्मा करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ तुकडीबद्दलही जाणून घेण्याची गरज आहे. नक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत १९९२ मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यावेळी, ६० जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचे ‘सी-६०’ असे नामकरण झाले. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारे महत्त्वाचे दल अशी त्याची ओळख तयार झाली. सध्या या पथकात हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रगत शस्त्र पुरवली जातात. ‘सी-६०’ या पथकातआदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.

‘सी-६०’ पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच नव्वदीच्या उत्तरार्धात आणि २०००च्या पूर्वार्धात नक्षलींनी ‘सी-६०’ मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना मारले होते. मात्र, त्याचा प्रभाव फार काळ राहिला नाही. खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट फोनचे विस्तारलेलं जाळे, केंद्रीय निमलष्करी दलाचे जादा पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षलवाद्यांवरचा दबाव वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -