
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील राजभवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार, सूत्रसंचालक संजय भुस्कुटे यांना ‘एन्जेल कम्युनिकेटर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोविड कालावधीत पर्यावरणविषयक जनजागृतीत व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर केलेल्या समाजोपयोगी कामाबद्दल संजय भुस्कुटे यांना सन्मानित करण्यात आले.
पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. कोविड साथीमुळे गेले दीड वर्षे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले होते; परंतु या महामारीत विविध क्षेत्रांतील काही लोकांनी समाजसेवेच्या माध्यमांतून आपले काम सुरू ठेवले होते. पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने ‘एन्जेल कम्युनिकेटर’ पुरस्कार प्रदान करून अशा काही मान्यवरांचा सन्मान केला.
या वेळी नर्गिस दत्त फांऊडेशनच्या अध्यक्ष व माजी खासदार प्रिया दत्त, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर, टाटा हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुदीप गुप्ता व डॉ. शैलेश श्रीखंडे या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात आले. संजय भुस्कुटे यांना यापूर्वी मटा सन्मान, सह्याद्री लक्स माणिक ॲवार्ड, रायगड भूषण, पत्रकारिता क्षेत्रातील रॅपा ॲवार्ड अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.