Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीही असंवेदनशीलतेची परिसीमा

ही असंवेदनशीलतेची परिसीमा

मालेगाव-अमरावतीतल्या दंगल प्रकरणी चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांची कातडी इतकी टणक आहे की आता गेंड्यालाही तो संवेदनशील असल्याचे वाटू लागले आहे. मनाला यातना देणाऱ्या घटना येथे वारंवार घडत आहेत. पण सरकारला त्याचे काही वाटेनासेच झाले आहे. मालेगाव-अमरावतीत झालेल्या दंगलींचे ज्या पद्धतीने सरकारमधले लोक समर्थन करतात ते पाहिले तर ही असंवेदनशीलतेची परिसीमा म्हणावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामूहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही,  इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात.  त्यासाठी पंधरा–वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात, याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तर हे भाजपवर आरोप करतात. अंमली पदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असे पाटील म्हणाले.

राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्त्व करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ठाकरे सरकार गुन्हेगारांचे समर्थक’

ठाकरे सरकार गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे आणि अराजकता माजवणाऱ्यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्याविरोधात भाजप संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, अशा शब्दांत आमदार आशीष शेलार यांनी राज्यातल्या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणीसारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्ह्यांने समर्थन करण्यात आले तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले. आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -