Thursday, July 10, 2025

ठाणे शहरातील उंच इमारती अग्निशमन दलाच्या रडारवर

ठाणे शहरातील उंच इमारती अग्निशमन दलाच्या रडारवर

ठाणे (वार्ताहर) : मुंबई येथील करी रोड परिसरात बहुमजली इमारतीत लागलेल्या आगीनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने धडा घेतला आहे. करी रोड परिसरात लागलेल्या उत्तुंग इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे अहवालात उघडकीस आले होते. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या दुर्घटनेनंतर धडा घेतला असून ठाणे शहरातील उंच इमारतींच्या फायर ऑडिटचे काम सुरू झाले आहे. सध्या अग्निशमन दलाकडे सुमारे २०० इमारतींची यादी आहे.


ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल विभागानेच दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५ इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे. ठाणे शहरामधील आधुनिकीकरण, विस्तार व त्या अनुषंगाने उंच इमारती, मॉल्स, मल्टीप्लेक्स, वाढत आहेत. एकीकडे ठाणे पालिकेच्या हद्दीत उंच इमारती उभ्या राहत आहेत. अशा उंच इमारतींमध्ये आग लागल्यास, ती विझवण्यासाठी इमारतींकडे स्वतःची यंत्रणा असणे बंधनकारक आहे. ठाण्यात काही दिवसांपूर्वी लागलेल्या एका गृहसंकुलातील इमारतीमध्ये लागलेल्या आगीच्या वेळी सदोष यंत्रणा उघडकीस आली होती.


२ मार्च २०२० पर्यंत सहा मजल्यांपेक्षा जास्त उंच असलेल्या २०० इमारतींची यादीही विभागाने तयार केली होती. मात्र कोरोनामुळे हे काम थांबवण्यात आले. आता कोव्हिडचे संकट टळू लागल्याने आणि दुसरीकडे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पुन्हा नव्याने फायर ऑडिटचे काम ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून प्राप्त झाली आहे.

Comments
Add Comment