Share

मंगेश पाठक

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं होतं. त्या वेळचं त्यांचं भाषण, त्यांचा वावर पाहता पुण्यातील शिवस्मारकाचं काम ते नक्कीच पूर्ण करतील, असं वाटलं होतं; परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आता फक्त त्यांच्या आठवणी उरल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाबासाहेबांच्या स्नेही अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि इतरांनी जागवलेल्या या खास आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक नेटकेपणाने परिचय करून देतात.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींचा खजिना आज अनेकांच्या मनात आहे. ‘जाणता राजा’ या महानाट्यामुळे ते महाराष्ट्रातच नाही, तर शेजारच्या राज्यांतही लोकप्रिय झाले. बाबासाहेब हे वरकरणी शाहीर असल्याचं म्हणत असले तरी यापलीकडे जाऊन ते इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक होते. बाबासाहेबांचा वावर केवळ इतिहासकारांमध्ये, अभ्यासकांमध्ये नव्हता, तर ते पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, कौसल्याबाई कोपरगावकर आदी सर्वांमध्ये समरस होऊन वागायचे. कोपरगावच्या गंगाधर बागुल यांच्या अमृत महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली होती. बागुल यांच्या वस्तीवर त्यांनी दोन दिवस मुक्काम केला होता. ते नगर जिल्ह्यात ‘जाणता राजा’ हे महानाट्य घेऊन आले, त्या वेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील-कदम यांच्या कुटुंबीयांची आवर्जून भेट घेतली होती. पुण्यात नगर जिल्ह्यातील निवडक लोकांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा पहिल्या तमाशा कलावंत कौसल्याबाई कोपरगावकर यांची त्यांनी सुंदरशी आठवण सांगितली होती. एकदा बाबासाहेब, पुलं आणि कौसल्याबाईंची भेट झाली. त्या वेळी बाबासाहेबांनी कौसल्याबाईंना लावणीवर नृत्य करायला सांगितलं. कौसल्याबाईही हजरजबाबी! त्या म्हणाल्या, भाईंनी हार्मोनियमवर साथ दिली, तर मी लावणी म्हणते आणि नृत्यही करते. भाईंनी हार्मोनियमवर साथ देण्याचं तत्काळ मान्य केलं आणि ती मैफल कायमची लक्षात राहील, असं बाबासाहेबांनीच सांगितलं होतं.

बाबासाहेबांनी इतिहास-संशोधकाचा मुखवटा बाजूला सारून शाहिरी वेष पत्करल्यानं आपल्याला चटकन त्यांचं मूळ दर्शन घडत नाही. ते त्यांनाच घडतं, ज्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला किंवा ज्यांनी त्यांच्याशी इतिहासावर चर्चा केली. ‘राजा शिवछत्रपती’ या बाबासाहेब लिखित शिवचरित्राच्या लाखो प्रति घराघरात पोहोचल्या. शिवप्रभूंना निरस सनसनावळ्यांतून बाहेर काढत लोकांच्या मनात इतिहासाविषयी प्रेम निर्माण करण्याचं श्रेय बाबासाहेबांना जातं. ‘राजा शिवछत्रपती’ पूर्वी बाबासाहेबांचं शिवचरित्र लेखमालेच्या रूपात प्रसिद्ध होत असे. तेव्हाही ते संशोधकी बाजाचं असल्यानं जनमानसात फारसं पोहोचत नव्हतं. अखेरीस, पुलं किंवा गोनिदा म्हणायचे तसं बाबासाहेबांनी संशोधकी पेहराव बाजूला ठेवून लालित्याचं रूप घेतलं, तेव्हा त्याला मिळालेला प्रतिसाद ‘न भूतो न भविष्यती’ असाच होता. बाबासाहेबांवर अनेकदा टीका झाली; परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे, असं बाबासाहेबांनी त्यांचे चरित्रकार सागर देशपांडे यांना सांगितलं होतं. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यावर ‘बेलभंडारा’ हे पुस्तक लिहिलं आहे.

‘बाबासाहेब पुरंदरे नावाच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्या अमोघ वाणीने त्यांनी उभ्या केलेल्या विशाल कालखंडाचा अस्त ही संपूर्ण समाजाची कधीही भरून न निघणारी हानी आहे’, असं म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आपल्या भावना व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘त्यांच्या जाण्यानं घरातला मोठा माणूस हरवल्याचं दु:ख झालं आहे. बाबासाहेबांशी आमच्या घराचे तीन पिढ्यांचे संबंध होते. माझे आजोबा आणि बाबासाहेबांमध्ये सख्खं मैत्र… इतिहासप्रेम, शिवाजीराजांप्रतीची अपार निष्ठा, दुर्गप्रेम या समान धाग्यांनी त्यांना अखेरपर्यंत एकमेकांशी बांधून ठेवलं. त्यांच्यातलं सौहार्द, प्रेम आम्ही अगदी जवळून अनुभवलं आहे. घरी त्यांचं सतत जाणं-येणं असल्यामुळे जन्मापासूनच मला त्यांचा स्नेह मिळाला. साहजिकच आजोबांबरोबरच त्यांच्या संस्कारांचं शिंपणही माझ्यावर झालं. मी आजोबा आणि बाबासाहेब यांच्याबरोबर अनेक दुर्गभ्रमंती केल्या आहेत. आज त्या सगळ्या स्मृतींचा आठव दाटून येत आहे. त्यावेळी त्या दोघांमधल्या गप्पांनी मला किती समृद्ध केलं हे शब्दांंत सांगता येणार नाही.’

मृणाल कुलकर्णी पुढे सांगतात, ‘त्यानंतरही वेळोवेळी मला बाबासाहेबांचं मार्गदर्शन मिळत राहिलं. ‘रमा-माधव’ चित्रपटाच्या वेळी त्यांनी सांगितलेले बारकावे, दिलेल्या सूचना आणि त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं होतं. जमेल तेव्हा ते सेटवर उपस्थित असायचे. ते क्षण कधीही विसरण्याजोगे नाहीत. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेच्या वेळीही त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं.त्या वेळच्याही असंख्य आठवणी आहेत, पण त्यातला एक संस्मरणीय प्रसंग आजही अंगावर काटा आणतो. त्या दिवशी आम्ही पहिल्या शॉटच्या तयारीत होतो. मी आणि अमोल कोल्हे आपापल्या व्यक्तिरेखेसाठी सज्ज झालो. शॉट उत्तम झाला. चित्रीकरण संपल्यानंतर कॅमेऱ्यापासून बाजूला होतो तोच बाबासाहेब साश्रुनयनांनी आमच्या समोर आले आणि त्यांनी अत्यंत श्रद्धाभावानं आम्हाला मुजरा केला. अर्थातच त्यांच्या मनातल्या आऊसाहेबांच्या आणि छत्रपतींच्या प्रतिमेला तो मुजरा होता, पण तो क्षण कधीही विसरण्याजोगा नाही.’

बाबासाहेबांच्या आठवणीमध्ये रमलेल्या मृणाल पुढे सांगतात, ‘माझे वडील दर वर्षी दुर्गसाहित्य संमेलन भरवत असत. सर्वसामान्यांमध्ये, विशेषत: तरुण पिढीमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचा हा उपक्रम असे. या उपक्रमासाठीही बाबासाहेबांचं मोलाचं मार्गदर्शन मिळायचं. या उपक्रमाला ते नियमित उपस्थिती नोंदवायचे आणि या उपक्रमाला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळायचे. अगदी अलीकडे शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर मी बाबासाहेबांना भेटायला गेले होते. अगदी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे एक मागणी केली. ती म्हणजे त्यांना माझा जिजाऊच्या व्यक्तिरेखेतला एक फोटो हवा होता. तो त्यांना दिवाणखान्यात लावायचा होता. त्यानुसार मी त्यांना फोटो देणार होते. मात्र त्याआधीच ते आजारी पडले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करू न शकल्याची खंत आयुष्यभर माझ्या मनात असेल. शेवटी एवढंच सांगते की, असा माणूस पुन्हा होणे नाही.’

आज अनेकांच्या भावना अशाच आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बाबासाहेबांविषयी बोलताना वेगळ्याच आठवणी कथन केल्या होत्या. त्या आज औचित्यपूर्ण ठरतात. ते म्हणाले, ‘मी बाबासाहेबांबरोबर बराच वेळ घालवला. ते अनेक गोष्टी सांगत असत. एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो. बाबासाहेब तळमजल्यावर बसले होते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती आणि हजारो जुन्या तलवारी त्यांच्या पुढ्यात होत्या. बाबासाहेब त्यातली एक-एक तलवार घेऊन साफ करत होते. मग त्यांनी मला सांगितलं की, प्रत्येक तलवारीला एक छिद्र असतं, काहींना दोन असतात, काहींना तीन असतात. एक छिद्र म्हणजे १०० माणसं मारली, दोन छिद्र म्हणजे २०० माणसं मारली. तीन छिद्र म्हणजे ३०० माणसं मारली… आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा कळल्या असत्या? बाबासाहेबांची इतिहास सांगण्याची वेगळी पद्धत आहे. ते इतिहास तुम्हाला आवडेल, रूचेल, समजेल अशा पद्धतीनं सांगायचे. त्यात दंतकथांना स्थान नसायचं.’

याच ओघात ते पुढे सांगतात, ‘बाबासाहेबांनी केलेलं देवगिरी किल्ल्याचं वर्णन मला आजही आठवतं. देवगिरी किल्ल्याला खंदक होते आणि त्या खंदकांमधून शत्रूला, मोगलांना आत शिरणं खूप कठीण होतं. देवगिरी किल्ल्यात मुघलांना शिरणं किती कठीण होतं, तर सीतेच्या हृदयात रावणाला शिरणं कठीण होतं तितकं देवगिरी किल्ल्यात मुघलांना शिरणं कठीण होतं, असं वर्णन त्यांनी केलं! याच प्रकारे ते आपल्या डोक्यात एखादी गोष्ट इतकी पक्की बसवायचे की, परिस्थिती नेमकी समजायची. अशा प्रकारे इतकी वर्षं बाबासाहेब इतिहास सांगत आले. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं आहे. पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचवलं आणि मनामनात झिरपवलं. खरं सांगायचं, तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलं. आपला इतिहास विसरलेल्यांना बाबासाहेबांनी या गोष्टींची जाणीव करून दिली. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, नाटकाच्या रूपाने असेल, पुस्तकाच्या रूपाने असेल वा अन्य कोणत्या रूपाने… मी एकदा रायगडावर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहे का? ‘कधीच नाही’, हे त्यावर त्यांचं उत्तर! मग मी म्हटलं की पोवाडा म्हटलाच नाही, तर तुम्ही शिवशाहीर कसे? यावर ते फक्त हसले होते. आता त्यांचं ते लोभस हास्य पुन्हा दिसणार नाही. पण ते कधीच जनतेच्या स्मृतीतून दूर जाणार नाहीत. समाजमनात त्यांचं स्थान कायमचं अग्रणी असेल’, असं म्हणत राज ठाकरे त्यांना विनम्र आदरांजली वाहतात.
(अद्वैत फीचर्स)

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

5 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

6 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

6 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

6 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

7 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

7 hours ago