Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीपुणे म्हाडाची ४२२२ सदनिकांसाठी ७ जानेवारीला सोडत

पुणे म्हाडाची ४२२२ सदनिकांसाठी ७ जानेवारीला सोडत

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे मंडळातर्फे पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या ४ हजार २२२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज भरणे व अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. नवीन वर्षात नागरिकांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्तीकरीता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत म्हाडा पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील गृहनिर्माण भवन कार्यालयात ०७ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना व प्रणाली या माहिती पुस्तिकेत समाविष्ट आहेत. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.

आजपासून सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्ज नोंदणीची सुरवात झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहिल. अर्ज नोंदणीची प्रक्रिया १६ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १७ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृती १७ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा २० डिसेंबर, २०२१ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ४ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी १० वाजता केली जाणार आहे.

पुणे मंडळाच्या सन २०२२ च्या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि. ०१/०४/२०२० ते दि. ३१/०३/२०२१ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावयाची आहे. तसेच अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये व उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता रु. ५९० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडतीची प्रक्रिया आहे. या व्यतिरिक्त म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळणेबाबत अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने यांनी केले आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता आणि संगणकीय सोडत प्रणालीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता सन २००९ पासून उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे. पुणे मंडळाच्या २०२१ च्या सोडतीसाठी देखील त्रिसदस्यीय उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे, अशी माहिती श्री. माने यांनी दिली .

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)

सदर सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी सांगली येथे १५ सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजना

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी पलूस सांगली येथे ३७ सदनिका, सांगली येथे ७ सदनिका व पिंपरी वाघिरे (ता. हवेली, जि.पुणे) येथे १७७ सदनिका सोडतीत उपलब्ध विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

२० टक्के सर्वसमावेशक योजना

पुणे महानगरपालिका हद्दीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी येथे २४ सदनिका, गगन इला मोहम्मद वाडी येथे २४ सदनिका, अरविंद एलान कोथरूड येथे १२ सदनिका, विंडसर काऊंटी फेज आंबेगाव बुद्रुक येथे ७ सदनिका, द ग्रेटर गुड मोहम्मद वाडी येथे १६ सदनिका, गुडविल ब्रिझा धानोरी येथे ३२ सदनिका, पनामा पार्क लोहगांव येथे २८ सदनिका, गिनी एरिया येवलेवाडी येथे ४२ सदनिका, सृष्टी वाघोली येथे ३६० सदनिका, स्प्रिंग हाईट्स आंबेगाव बुद्रुक येथे १४ सदनिका, ग्रीन काऊंटी फुरसुंगी येथे १६ सदनिका, द किंग्सवे घोरपडी येथे ७३ सदनिका, ६७ के इन्कलुसिव्ह हाऊसिंग खरेदी येथील ७१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी दिघी येथे १४ सदनिका, चऱ्होली येथे ४१ सदनिका, चिखली येथे ३६ सदनिका, डुडुळगाव येथे २८ सदनिका, किवळे येथे १४ सदनिका, मोशी येथे ६४ सदनिका, चोवीसावाडी येथे ४० सदनिका, पुनावळे येथे १५५ सदनिका, वाकड येथे १२ सदनिका, वाकड येथे २० सदनिका, पिंपरी येथे ५५ सदनिका, रावेत येथे ४२ सदनिका, बोऱ्हाडेवाडी येथे ३४ सदनिका, ताथवडे येथे १४ सदनिका, थेरगाव येथील २० सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी पिंपरी वाघिरे येथे १५८ सदनिका तर जुळे सोलापूर येथे ४ सदनिका सोडतीत उपलब्ध आहेत.

मध्यम उत्पन्न गटासाठी सांगली येथे १२ सदनिका, चाकण-महाळुंगे येथे ४९४ सदनिका, पिंपरी वाघिरे येथे २८० सदनिका, जुळे सोलापूर येथे ६१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी सांगली येथे १७ सदनिका, चाकण-महाळुंगे (इंगळे) येथे ८१७ सदनिका, शिवाजीनगर जि. सोलापूर येथे १० सदनिका, धायरी येथे ७५ सदनिका, येवलेवाडी येथे १६ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी सांगली येथे ३२ सदनिका, चाकण-महाळुंगे (इंगळे) येथे ४६६ सदनिका, तळेगाव दाभाडे येथे २२५ सदनिका, बार्शी (जि. सोलापूर) येथे ११ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -