Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नांदेड हिंसाचार; ५० जणांना अटक

नांदेड (प्रतिनिधी) : त्रिपुरा येथील हिंसाचारानंतर नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये दगडफेकीच्या घटनांतील ८३ पैकी ५० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.शहरातील वातावरण बिघडू पाहणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांनी रझा अकादमीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच व्यासपीठावरून प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे.

दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेनं पुकारलेला बंद रद्द करण्यात आला असला तरीही पोलिसांनी सतर्कता बाळगत बंदोबस्त वाढवला असल्याची माहितीही संजय कुमार यांनी दिली आहे. दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चातही दगडफेक झाल्याने गालबोट लागले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उमटले. राज्यातील नांदेड, अमरावती, परभणी या शहरांमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात दगडफेक करण्यात आली. नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले आणि शिवाजीनगर येथील दुकानाची नासधूस करत, व्यपाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. तसंच शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यामुळे नांदेड शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. या घटनेत नागरिक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत संशयितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -