Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखशिवकालीन संशोधकाला, महाराष्ट्र मुकला

शिवकालीन संशोधकाला, महाराष्ट्र मुकला

बळवंत मोरेश्वर ऊर्फ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाव घराघरात ठाऊक आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अन्य राज्यात राहणाऱ्या मराठी माणसाला बाबासाहेबांच्या शिवचरित्राने मंत्रमुग्ध केले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवचरित्राने तीन पिढ्यांवर संस्कार केले आहेत. ‘जाणता राजा’ हे महानाट्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेला अमूल्य ठेवा आहे. बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.

बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्राचे वैभव होते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने शिवशाहिरांना ‘पद्मविभूषण‘ सन्मान दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली व मर्दानी इतिहास शिवचरित्र्याच्या माध्यमातून त्यांनी देश-विदेशात पोहोचवला. त्यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी ते घरात घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्यात आले. १९२२ पासून सुरू झालेला त्यांच्या जीवनाचा प्रवास सोमवारी पहाटे संपला आणि महाराष्ट्र एका थोर इतिहास संशोधकाला मुकला. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सारा महाराष्ट्र हळहळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांपासून अनेकांनी दु:ख व्यक्त केले. शिवचरित्राच्या अभ्यासाला आयुष्यभर वाहून घेतलेला महान संशोधक गेला, हीच भावना सर्वांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी शिवमहिमा घरोघरी पोहोचविण्याचे व्रतच घेतले होते. असा शिवउपासक यापूर्वी झाला नाही. शिवचरित्र गाथा ओघवत्या शैलीने आपल्या वाणीतून आणि लेखणीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारा दुसरा लेखक, शाहीर आणि वक्ता झाला नाही आणि नजीकच्या भविष्यात त्यांची पोकळी भरून निघण्याचीही शक्यता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आयुष्यातील आठ दशकांहून अधिक काळ शिवचरित्राचे संशोधन, लेखन आणि प्रसार यासाठी त्यांनी वाहून घेतला होता. महाराष्ट्राला शिवसाक्षर करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. या वर्षी चौदा आॅगस्टला त्यांचा एका कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना, मी तृप्त आहे, मी संतुष्ट आहे, मी आनंदी आहे, प्रेम वाटत राहा, कुणाचा द्वेष करू नका, मी सुखी आहे, असे त्यांनी उद्गार काढले होते. हाच त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात एका शिक्षकाने खूप परिश्रम करून लिहिलेल्या गड किल्ल्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. व्यासपीठावर बसलेल्या बाबासाहेबांना त्या शिक्षकाचे खूप कौतुक वाटले. या पुस्तकाच्या लिखाणासाठी त्याने किती वेळ दिला असेल, किती गड किल्ले फिरला असेल, त्याला किती खर्च आला असेल, असा त्यांनी विचार केला, त्याच्या कामाबद्दल त्याला शाबासकी देताना त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचा गोफ त्या शिक्षकाच्या हातात ठेवला. बाबासाहेबांनी जे काही आयुष्यात मिळवले ते इतरांना वाटून दिले.

बाबासाहेब हे शिवछत्रपतींचे श्रेष्ठ पाईक होते. शिवमाळेतील एक तेजस्वी मणी गळून पडला, अशी भावना त्यांच्या निधनानंतर प्रकट होत आहे. शिवशाहीर अबोल झाला, शिवचरित्र सांगणारी ओजस्वी वाणी मूक झाली. आजही ते सतराव्या शतकात आहोत, असे समजून ते अभ्यास व संशोधन करीत होते. शिवचरित्राची निर्मिती खरोखरच अद्वितीय आहे. केवळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत नव्हे, तर देशातील विविध भाषांमध्ये शिवचरित्र प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिमानास्पद कारकिर्दीचा इतिहास बाबासाहेबांनी देशात घरोघरी पोहोचवला आहे. शिवचरित्र लिहिण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली, गड किल्ले पायी पायी चढले. जिथे महाराज राहिले, जिथे महाराज पोहोचले, जिथे महाराजांचा स्पर्श झाला, त्या वास्तू आणि वस्तूंपर्यंत बाबासाहेब पुरंदरे स्वत: पोहोचले, त्याचा अभ्यास करून शिवचरित्र लिहिले. ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या १६ आवृत्त्या निघाल्या. पाच लाखांपेक्षा जास्त प्रती घरोघरी पोहोचल्या. कीर्तन, भारूड, शाहिरी, गोंधळ अशा विविध लोककलांचा उपयोग त्यांनी शिवचरित्राच्या प्रसारासाठी केला. शिवचरित्र लिहिताना संशोधन करून लोकांपुढे सत्य आणि वास्तव मांडण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. त्यांचे संशोधन आणि इतिहास लेखन वाचताना आपण शिवकालीन युगात आहोत, असे वाटू लागते, एवढे शब्दांचे सामर्थ्य बाबासाहेबांच्या लिखाणात आहे. ‘जाणता राजा’ हे महानाट्य म्हणजे फार मोठे शिवधनुष्य होते, दीडशे कलाकारांसह हत्ती, घोडे यांच्या लवाजाम्यासह त्यांनी ते समर्थपणे पेलले. ललित लेखन, कादंबरी लेखन आणि नाट्य लेखन अशा तिन्ही क्षेत्रांत बाबासाहेबांनी लेखक म्हणून भरारी घेतली. त्यांच्या निधनानंतर शिवकालीन गडही गहिवरले असतील. बाबासाहेबांचे निधन म्हणजे शिवशाही पर्वाचा अस्तच म्हणावा लागेल. लहानपणापासून त्यांना इतिहास व संशोधनाची आवड होती. तरुण वयातच ते पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. ग. ह. खरेंसारखे थोर संशोधक हे त्यांच्या गुरुस्थानी होते. इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचाही सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. जिज्ञासू, संशोधक व चिकित्सक वृत्तीने त्यांनी गड किल्ले पालथे घातले. दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रमात संगीतकार सुधीर फडके यांच्याबरोबर त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यसैनिक ते शिवशाहीर असा विलक्षण प्रवास असलेल्या महान शिवसंशोधकाला महाराष्ट्र मुकला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -