लेखी उत्तर देण्याचीही केली मागणी
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समिती सभागृहात मंजुर झालेले काम नंतर बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांनाही नाही. मग त्यात कसा बदल करण्यात आला? असा सवाल मंगळवारी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना केला तसेच याबाबातचे शासन निर्णय तपासून मला याचे लेखी उत्तर द्यावे, अशी मागणीही राणे यांनी केली.
कणकवली विधानसभा मतदार संघातील ओसरगाव व वागदे गावातील नागरिकांच्या मागणीनुसार सभागृहाने मंजूर केलेली व निविदा झालेली साकवांची कामे आमदार वैभव नाईक यांच्या लेखी पत्राने थांबविण्यात आली. त्याबद्दल आमदार नितेश राणे या सभेत आक्रमक झाले. आम्ही आमदार म्हणून कुडाळ मतदार संघातील कामे कधी थांबविलेली नाहीत.
मात्र वैभव नाईक दुसऱ्या मतदार संघातील जनतेची कामे थांबवतात, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी ही सभा संपताच उपोषण सुरू असलेल्या स्थळी भेट देऊन जनतेचा हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांना या सभेत दिली. नितेश राणे यांनी आक्रमकता दाखवताच पालकमंत्र्यांना या प्रश्नी गंभीर दखल घ्यावी लागली.
अद्याप खर्च ९ टक्केच
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती अंतर्गत यावर्षी प्राप्त निधीपैकी आतापर्यंत ९ टक्के एवढा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यासाठी मंजूर एकूण १७० कोटी रु. विकास निधीपैकी पहिल्या टप्प्यात १० टक्के एवढीच रक्कम प्राप्त झाली होती.
त्यापैकी नऊ टक्के एवढा खर्च आतापर्यंत झाला आहे, तर उर्वरित ९० टक्के एवढी रक्कम अलीकडेच प्राप्त झाली असून सर्वांनी मार्च अखेरपर्यंत हा सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करावे आणि शंभर टक्के निधी खर्च करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
सभेच्या सुरुवातीला पद्मश्री प्राप्त गंगाराम गंगावणे यांचा तसेच केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सोमवारीच देवाज्ञा झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभा नियमात चालवा…
सभा सुरू होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात मंजूर झालेली कामे नंतर बदलतात. हे कसे होते? सभागृहाबाहेर कामे बदलण्याचा पालकमंत्र्यांनाही अधिकार नाही. असे असताना ती कशी बदलण्यात आली? असा सवाल जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांना केला. या बाबतचे शासन निर्णय तपासून मला उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच जर सभा नियमाप्रमाणे होणार नसेल, तर आम्ही सभागृहात थांबणार नाही. पण सभा नियमात चालत असेल, तर आमचे पूर्ण सहकार्य असेल, असे राणे यांनी ठणकावले. त्यामुळे सभा वादळी होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
यावर खुलासा करताना पालकमंत्री म्हणाले की, सभागृहाबाहेर केवळ जी मंजूर कामे संबंधित ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना नको होती तसेच तेथील लोकप्रतिनिधींना नको होती, केवळ अशीच कामे बदलण्यात आली. तसेच जी. प. कडून येणारी यादीही प्रत्येकवेळी नवीन असते, असे सांगितले. मात्र यावर आपले समाधान झालेले नसून, या बाबतचा शासन निर्णय तपासून मला लेखी स्वरूपात देऊन नंतर उत्तर द्या, असे राणे यांनी सांगितल्याने हा विषय तेथेच थांबला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
जिल्हा नियोजन सभेच्या बाहेर सुरू असलेल्या जनआंदोलनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली. खड्डे आणि गावातील पथदिपाचे लाईट बिल भरण्यासाठी सरकारकडून दिला जाणारा त्रास यासाठी भाजप सरपंच सिंधुदुर्गच्या वतीने उपोषण करण्यात आले. वागदे, ओसरगाव येथील विकासकामे शिवसेना पक्षातील ठेकेदाराला मिळाली नाहीत, म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी कामे प्रलंबित ठेवली. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले, तर कुडाळ तालुक्यातील नेरूर घाडीवाडा येथे जाणारा रस्ता स्थानिक राजकारणात अडवला गेला, त्यांचीही राणे यांनी भेट घेतली.