पुणे (प्रतिनिधी) : पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत सोमवारी मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. काल दुपारी पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
राज्य सरकारच्या वतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीष बापट, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच खासदार अरविंद सावंत, पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
संपूर्ण शासकीय इतमामात पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.
मागील आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार उल्हास पवार, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच अन्य दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.