Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबंद एसटी सेवेमुळे जिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प

बंद एसटी सेवेमुळे जिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प

नरेंद्र मोहीते

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला आठ दिवस उलटले तरी शासनाला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यातील नऊही आगारातील एसटी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य जनता, व्यापारी, शालेय विद्यार्थी यांना बसला असून जिल्ह्यातील सर्व शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठाही पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर व लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आल्यानंतर पूर्वपदावर येऊ पाहणारी जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि जनजीवन एसटी बंदमुळे पुन्हा कोलमडले आहे.

एसटी सेवा ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. सर्वसामान्य जनतेला शहर वा अन्य ठिकाणी खरेदी विक्रीसाठी, डॉक्टरकडे वा अन्य कोणत्याही कामासाठी जायचे असेल, तर एसटी हीच हक्काची सेवा आहे.

मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी सोमवार ८ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा आणि राजापूर या नऊ आगारांतील सर्व कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील या नऊ आगारांतून दररोज ग्रामीण भागासह मुंबई, पुणे, बोरिवली, तुळाजापूर, सोलापूर, सांगली, लातूर, औरंगाबाद अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. जिल्ह्यात दररोज ३ हजार ९९५ फेऱ्या सोडल्या जातात, यामध्ये लांब पल्ल्याच्या ३०० फेऱ्या असून उर्वरित ग्रामीण भागातील फेऱ्या आहेत. दररोज सुमारे १ लाख ९६ हजार किलोमीटर वाहतूक केली जाते.

यातून दररोज रत्नागिरी विभागाला सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळते, तर एसटीच्या पासधारक विद्यार्थ्यांची संख्या ही जिल्ह्यात सुमारे ७५ हजार इतकी आहे. जिल्ह्यातील सर्व आगार आणि प्रशासकीय सेवेत ४ हजार २७१ कर्मचारी कार्यरत आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली आणि राजापूर हे मोठे डेपो असून या आगारांतून सर्वाधिक फेऱ्या व उत्पन्न मिळते. मात्र गेले आठ दिवस संपूर्ण जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प असून आत्तापर्यंत सुमारे चार कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे हा संप असाच सुरू राहिला, तर एसटीला मोठा फटका बसणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाला आठ दिवस उलटले तरी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात सर्वसामान्य जनता पुरती भरडली जात आहे. याचा फटका आता जिल्ह्यातील सर्व शहरांतील प्रमुख बाजारपेठांना व ग्रामीण भागातील बाजारपेठांना बसला असून आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे.

कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येणारी बाजारपेठ आणि जनजीवन एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे पुन्हा कोलमडली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत पण एसटी बस नसल्याने विद्यार्थ्यांनाही शाळेत पोहोचता येत नाही, अशी अवस्था आहे. तर वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यात मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यात वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होत आहे, तर छोटे विक्रेते, भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक यांनाही याचा फटका बसला आहे.

तर खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून दामदुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेची मात्र ससेहोलपट होत आहे. त्यामुळे शासनाने या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. एकीकडे एसटी तोट्यात आहे, अशी ओरड केली जाते, त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तर दुसरीकडे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिला तर आणखी किती तोटा होईल? याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे संपावर शासनाकडून कोणताही तोडगा न काढता कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेलाही वेठीस धरले जात आहे. मात्र या एकूणच एसटीच्या बंदमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला आणि जनजीवनाला ब्रेक लागला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -