कल्याण (वार्ताहर) : झाडांवर लोखंडी खिळे आणि तारेचा वापर करून विद्युत रोषणाई आणि बॅनरबाजी करण्यास हरित लवादाने सक्त मनाई केली आहे तसेच अशा पद्धतीने झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वृक्षसंवर्धनासाठी परिपत्रक काढून कारवाई हाती घेतल्याची माहिती सचिव संजय जाधव यांनी दिली.
महानगरपालिकेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक काढले असून शहरात मोठ्या प्रमाणात झाडांना पोस्टर, बॅनर, खिळे आणि झेंडे काढण्याचे काम सुरू झाले आहे. अंघोळीची गोळी या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या खिळेमुक्त झाडे उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभर झाडांवर ठोकलेले खिळे, बॅनर, पोस्टर, झेंडे काढण्याचे काम अनेक युवक करत आहेत. त्याचबरोबर झाडांना मातीचे आळे असावे आणि झाडांच्या पायथ्याशी सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक लावण्यात येऊ नये आणि झाडांना गेरू आणि चुना व्यतिरिक्त इतर कोणतेही रंग लावले जाऊ नयेत.
झाडांना लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या नादुरुस्त असल्यास काढण्यात याव्यात. यासाठी संस्था वेळोवेळी महाराष्ट्रभर विविध महानगरपालिकांशी पत्रव्यवहार करत आहे. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ रोखायची असल्यास, वृक्षसंवर्धन हाच एकमेव प्रभावी उपाय असल्यामुळे विभागाने तत्काळ कारवाई केल्याने पर्यावरणप्रेमींनी या कृतीचे स्वागत केले आहे.