ठाकरे सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होतील. दोन वर्षांत या सरकारने काय केले, असा प्रश्न कोणी विचारला, तर सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी झाले आहे, असे चित्र दिसेल. कोविडच्या काळात दीड वर्ष राज्याच्या आरोग्य सेवेचा कसा बोजवारा उडाला होता, हे साऱ्या देशाने बघितले. परीक्षा असो किंवा शाळा- कॉलेजेस सुरू करण्याच्या तारखा असोत, सरकारला निर्णय घेता येत नाही. नाट्य किंवा चित्रपटगृहे कधी सुरू करायची, हेही ठरवायला महिनोनमहिने लागले. रेल्वेचा पास कुणाला नि तिकीट कुणाला, हे ठरवताना ठाकरे सरकारने किती घोळ घातला व त्याचा मन:स्ताप महामुंबईतील लक्षावधी नागरिकांना भोगावा लागला. ठाकरे सरकार आहे कुठे, असा प्रश्न पडतो?
कायदा व सुव्यवस्थेची राज्यात वाट लागली आहे. माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत, माजी पोलीस आयुक्त हे वॉन्टेड असून त्यांच्या विरोधात अटक वॉरन्ट निघाले आहे. एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी एकाला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. अर्धा डझन मंत्र्यांवर त्यांनी केलेले गैरव्यवहार नि बेहिशेबी मालमत्ता यांची चौकशी चालू आहे. निर्णय कोणाच्या सल्ल्यावरून घेतले जातात, हेच या सरकारमध्ये गूढ आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर येथे मोटारीखाली चार आंदोलक शेतकरी चिरडले गेले म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पाळला. भाजपला दोष देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस टपलेलीच असते व त्यांच्याबरोबर शिवसेना कशी फरफटत जाते, हे महाराष्ट्र बंदच्या वेळी दिसले. बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत, त्या देशात हिंदूंच्या मंदिरांना आगी लावल्या जात आहेत, त्याच्या निषेधार्थ त्रिपुरातील हिंदू संघटनांनी मोर्चे काढून आक्रोश प्रकट केला. त्यावेळी कोणीतरी आक्षेपार्ह उद्गार काढले, अशी अफवा पसरली. जे घडले आहे, याची खातरजमा न करताच रझा अकादमी व अन्य काही मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंद पुकारला.
जसे उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरणे गैर होते, तसेच त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्र बंद पाळणेही चुकीचे होते. पण, आपण स्वत: केल्यानंतर, इतर कोणी महाराष्ट्र बंद पुकारला, तर त्यांना कोणत्या अधिकारात रोखणार, अशी अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे. रझा अकादमी ही संघटना काय आहे, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे. याच संघटनेने काही वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर धुडगूस घातला होता. दक्षिण मुंबईत हिंसाचार घडवला होता; सीएसएमटीसमोर शेकडो खासगी वाहनांची तोडफोड केली होती. ती संघटना महाराष्ट्र बंद पुकारते, तेव्हा पोलिसांनीच त्यांना रोखायला हवे होते. पण, राज्याचे गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या कृपेने सत्तेच्या खुर्चीवर बसले आहेत, मग धर्मांध मुस्लीम संघटनांना लगाम घालण्याचे धाडस तरी कोण करणार?
लोकशाहीत आंदोलन करणे, हा जरी अधिकार असला, तरी हिंसाचार, मोडतोड आणि दगडफेक करण्याचा कायद्याने कोणाला अधिकार दिलेला नाही. महाराष्ट्रातील आंदोलनात काश्मीरसारखी दगडफेक झाली. धर्मांधांनी रस्त्यावर येऊन हैदोस घातला. मालेगावात दगडफेक झाली, नांदेडमध्ये पोलिसांवरच हल्ले झाले, अमरावती, हिंगोली, वाशीम, परभणी, भिवंडी, मुंबईतील मुस्लीम विभागात त्रिपुराच्या घटनेचे पडसाद उमटण्याचे कारणच काय? विशेष म्हणजे, महाराष्ट्र बंदला विरोध करण्याचे धाडस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेने दाखवले नाही.
हिरव्या मतांसाठी शिवसेना किती लाचार झाली आहे, हे शुक्रवारच्या महाराष्ट्र बंद व घडलेल्या हिंसाचारात दिसून आले. आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात. मग मुस्लीम संघटना त्रिपुरातील कथित घटनेचे भांडवल करून औरंगाबाद, अमरावतीपासून भिवंडीत धुडगूस घालत होत्या, तेव्हा शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले होते? भगव्याची शपथ घेऊन, भगव्याची अस्मिता राखून आणि भगव्याचा अभिमान बाळगून शिवसैनिक स्वत:ला कट्टर हिंदू म्हणवत असत; पण गेली दोन वर्षे हा भगवा रंग कसा पुसट झाला आहे आणि हिरव्या रंगाचे आकर्षण कसे वाढत चालले आहे, हेच यावेळी दिसून आले.
महाविकास आघाडीचे नेते, मंत्री अगदी मुख्यमंत्रीही केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करीत असतात. केंद्रीय चौकशी यंत्रणा या राजकीय सूड घेण्यासाठी वापरल्या जातात, असे सांगत असतात आणि धर्मांध आंदोलक राज्याच्या पोलिसांवरच हल्ले करतात. हे कशाचे द्योतक आहे? राज्यातील एकाच वेळी पाच-सात शहरांत मुस्लीम संघटना रस्त्यावर येऊन हिंसाचार घडवतात, याची कल्पना राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला नव्हती की, माहिती मिळूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले? सलमान खुर्शीद हिंदुत्वाची तुलना इसिस व बोको हराम या दहशतवादी संघटनांशी करतात, राहुल गांधी पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात भाजप-संघाची विचारधारा विभाजनवादी असल्याचे सांगतात, शशी थरूर हे हिंदू तालिबान असा उल्लेख करतात. स्वत: राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करतात. आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत गेल्यावर, जे चौकशी यंत्रणांवर आगपाखड करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना सत्तेत बसली आहे. म्हणून औरंगाबाद, अमरावती, मालेगाव, भिवंडी, हिंगोली, वाशिम येथे घडलेल्या हिंसक घटनांविषयी शिवसेना मूग गिळून बसली आहे.
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…
स्पेन : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये अंधार पसरला आहे. स्पेन, फ्रान्स आणि…
मुंबई : उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या…
निश्चित मुदतीनंतरही भारत न सोडणाऱ्या पाक नागरिकांना होणार तुरुंगवास, कायद्यात देखील आहे तरतूद नवी दिल्ली:…
८वा वेतन आयोग अपडेट : महागाई भत्ता बेसिकमध्ये जोडला जाणार का? मोठा बदल होणार! नवी…
पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…