Thursday, November 14, 2024
Homeताज्या घडामोडीबोईसर आगाराला ८ दिवसांत ५६ लाखांचा फटका

बोईसर आगाराला ८ दिवसांत ५६ लाखांचा फटका

संदीप जाधव

बोईसर : राज्यभर सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या संपामुळे बोईसर आगाराची चाके गेल्या आठ दिवसांपासून जाम झाल्याने आतापर्यंत ५६ लाख रुपयांचा फटका बसला आहे. आठ दिवसांत एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची चढ-उतार बंद झाली आहे. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे.

बोईसर-तारापूर एमआयडीसीमध्ये कोकणातील लाखो कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. ऐन दिवाळीत संप पुकारण्यात आल्याने या संपाचा फटका दिवाळीनिमित्ताने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. एसटीच्या संपामुळे बोईसर आगारातून विशेष सेवा देणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील गरीब प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.

बोईसर आगाराचे कर्मचारी संपात सहभागी असल्याने आगाराला प्रतिदिन आठ लाख रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे प्रतिदिन पाच ते साडेपाच हजार प्रवाशांची चढ-उतार थांबली आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीवर आंदोलक ठाम असून तोडगा निघाला नाही, तर प्रवाशांचे असेच हाल होणार आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. खरे तर विलीनीकरण झाल्याने प्रवासी कर जो १७ टक्के प्रवाशांच्या तिकिटावर आकारला जात आहे, तो बंद होईल. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.

लोकप्रतिनिधींची संपाकडे पाठ

आतापर्यंत बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, रिवॉल्यूशनरी मार्क्सिस्ट पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी, आदिवासी एकता परिषद (भूमिसेना) यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आगारात येऊन भेट घेऊन आम्ही आपणा सर्वांच्या सोबत असून आमचा आपल्या संपाला जाहीर पाठिंबा देत असल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र, याच जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सत्ताधिकारी पक्षांत जाण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एकमताने मतदान केले, ते मात्र साधे ढुंकूनही पाहत नसल्याची खंत संपात सहभागी झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून दडपशाही?

प्रशासनाने संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहास टाळे ठोकले आहे. बाहेरील जिल्ह्यातील जे कर्मचारी या आगारात कार्यरत आहेत, त्यांना तुटपुंज्या पगारामुळे भाड्याने रूम घेऊन राहणे परवडत नसल्याने ते विश्रांतीगृहाचा आधार घेतात; परंतु प्रशासनाने विश्रांतीगृहच बंद केल्यामुळे हे कर्मचारी बसस्थानकामध्ये मंडपात राहतात. हा मंडप भारतीय जनता पक्षाच्या बोईसर स्थानिक प्रतिनिधींकडून करून देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -