कोकणी बाणा : सतीश पाटणकर
कच्चे रेशीम बनवण्यासाठी रेशीम किड्यांच्या संगोपनाला रेशीम किंवा रेशीम शेती म्हणतात. रेशीम उत्पादनाच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रकारचे रेशीम येथे घेतले जातात. रेशीम शेती उद्योग हा शेतीवर आधारित व रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला ग्रामीण भागाचा कायापालट करणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल असून उत्पादनाची शाश्वती व धोक्यापासून हमी असणारा तसेच सध्याच्या परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता असणारा उद्योग होय. पावसाची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, वेळेत उपलब्ध होऊ न शकणारा मजूरवर्ग, बेभरवशाची बाजारपेठ आणि कच्च्यामालाची अनिश्चितता या सर्व बाबींमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो, तेवढे उत्पन्नही मिळत नाही. पर्यायाने, फक्त शेतीवर अवलंबून राहणे शेतकऱ्यास दुरापास्त झालेले आहे. त्यामुळे सदरील बाबींचा सर्वंकष विचार करून शेतकरी बांधवाना शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. रेशीम शेती हा एक सर्वोत्कृष्ट पूरक उद्योग म्हणून पुढील बाबी विचारात घेता शेतकऱ्यांस एक वरदान ठरणारा आहे.
तुती लागवड व कीटक संगोपनाद्वारे कोष निर्मिती व विक्रीद्वारे हमखास उत्पादन घेता येऊ शकते. महाराष्ट्रात हा उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या या उद्योगामुळे ग्रामीण विकासात याचे मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम शेती उद्योगासाठी तुतीची लागवड व कीटक संगोपन व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. रेशीम शेती उद्योगाला संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. रेशीम शेती उद्योगातील निर्मित कोषापासून रेशीम धागा व त्यापासून वस्त्र तयार करतात.
रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी १६ ते २० टक्क्यांनी वाढत आहे. स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कीटक संगोपन, धागा व वस्त्र निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती तसेच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रेशीम शेती उद्योगामुळे थांबवता येते. महाराष्ट्रात एक एकरातील तुती लागवडीद्वारे वर्षभरात लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांची नोंद आहे.
आजकाल शेती एक उद्योग म्हणून उदयास येत आहे. प्रत्यक्षात, माती सोने पिकवत आहे, मग ती भूखंडाच्या स्वरूपात असो किंवा शेताच्या स्वरूपात. शेती आता फक्त गहू आणि तांदळाची लागवड करण्यापूर्ती मर्यादित नाही. पशुपालन, मत्स्यपालन, दुग्ध प्रक्रिया प्रकल्प, दुग्ध उद्योगासह अनेक व्यवसाय आहेत, ज्यातून आज शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. शेतीतून मिळणारे उत्पन्न पाहता अनेक युवक आपली नोकरी सोडून शेताकडे वळत आहेत. शेतीशी संबंधित असेच एक काम आहे, जे चांगले पैसे मिळवून सुरू करता येते. शेतीशी संबंधित कामांपैकी एक म्हणजे रेशीम किड्यांचे संगोपन. कच्चे रेशीम बनवण्यासाठी रेशीम किड्यांच्या संगोपनाला रेशीम किंवा रेशीम शेती म्हणतात. रेशीम उत्पादनाच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रकारचे रेशीम येथे घेतले जातात. भारतात ६० लाखांहून अधिक लोक विविध प्रकारच्या रेशीम कीटकांच्या संगोपनात गुंतलेले आहेत.
रेशीम उत्पादन व्यवसाय हा महत्त्वाचा कृषी कुटिर उद्योग मानला जातो. रेशीम किड्यांद्वारे रेशीम धाग्यांचे उत्पादन घेतले जाते. यात रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी तुतीच्या झाडांची लागवड, कोषनिर्मिती, प्रक्रिया आणि विणकाम या प्रवासातून रेशीम तंतू निर्मिती होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादन घेतले जाते. इतर राज्यांमध्ये अपारंपरिक पद्धत वापरली जाते. तुती रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. राज्यातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूलही आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीची क्षमता या व्यवसायात आहे.
भारतातील केंद्रीय रेशीम संशोधन केंद्राची स्थापना १९४३ साली बहारामपूर येथे झाली. यानंतर, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी रेशीम मंडळाची स्थापना १९४९ची करण्यात आली आहे. मेघालयातील सेंट्रल एरी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रांचीमध्ये सेंट्रल तुसार संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. भारत सरकार रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याचे काम करते. या व्यतिरिक्त, सरकार रेशीम कीटक संगोपन, रेशीम किड्यांची अंडी, कीटकांपासून तयार केलेल्या कोकोसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उपकरणे पुरवण्यास मदत करते. भारतात तीन प्रकारची रेशीम शेती आहे.तुती शेती, तुसार शेती आणि एरी शेती. रेशीम हे कीटकांच्या प्रथिनेपासून बनलेले फायबर आहे. तुती, अर्जुनाच्या पानांना खाणाऱ्या कीटकांच्या अळ्यांपासून उत्तम रेशीम तयार केले जाते. तुतीची पाने खाऊन कीटकांनी निर्माण केलेल्या रेशीमाला तुती रेशीम म्हणतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, जम्मू -काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथे तुती रेशीम तयार होते. तुती नसलेले रेशीम झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तयार होते.
केंद्रासह प्रत्येक राज्य सरकार स्वतःच्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी रेशीम योजना तयार करते. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकर जमिनीत तुती लागवड आणि रेशीम कीटक पालन करायचे आहे, त्यांना रेशीम पालनामध्ये करिअर करण्यासाठी अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठात यासंबंधी डिग्री- डिप्लोमा कोर्स शिकवले जातात. रेशीम शेतीशी संबंधित अभ्यासासाठी, आपण या संस्थांशी संपर्क साधू शकता. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बलरामपूर. सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, भुवनेश्वर. शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पंपूर, जम्मू आणि काश्मीर यांना सरकार सर्व प्रकारची मदत देत असते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)