Friday, July 19, 2024
Homeक्रीडाटी-ट्वेन्टी वर्ल्डकपला मिळणार नवा विजेता

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपला मिळणार नवा विजेता

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये आज ऐतिहासिक फायनल

दुबई (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू असलेल्या सातव्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या फायनलला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या महाअंतिम फेरीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विजेता मिळेल.

झटपट क्रिकेटमधील वर्ल्डकपमधील उभय संघांचा आढावा घेतल्यास ऑस्ट्रेलिया टॉपला आहे. २०१५ वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात प्रतिस्पर्ध्यांवर ७ विकेटनी मात करताना कांगारूंनी एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जेतेपदांची संख्या पाचवर नेली. इतकी जेतेपदे मिळवणारा कांगारू हा एकमेव संघ आहे. मात्र, टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जेतेपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे. सुरुवातीच्या हंगामांमध्ये खेळ उंचावलेल्या ऑस्ट्रेलियाने २०१०मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या चौथ्या वर्ल्डकपमध्ये फायनल प्रवेश केला होता. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्यांना इंग्लंडकडून ७ विकेटनी मात खावी लागली. मागील दोन हंगामांमध्ये कांगारूंचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. ११ वर्षांनंतर फायनल प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाला जेतेपद पटकावण्याची संधी चालून आली आहे.

न्यूझीलंडला झटपट क्रिकेटमध्ये आयसीसी ट्रॉफी उंचावता आली नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धांतील सेमीफायनल ही त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-ट्वेन्टी प्रकारातही तीच स्थिती आहे. पहिल्या (२००७) आणि शेवटच्या (२०१६) वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरीत खेळण्याचा पहिला अनुभव असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१९ वनडे फायनलमधील बाउंड्रीजच्या आधारे हुकलेले जेतेपेद किवी संघ अद्याप विसरलेला नाही. त्या पराभवाचा सव्याज बदला घेऊन कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ टी-ट्वेन्टी वर्ल्डकप उंचावण्याची संधी न्यूझीलंडला चालून आली आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता कांगारू आणि किवींची कामगिरी समसमान आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडने इंग्लंडवर प्रत्येकी ५ विकेटनी विजय मिळवला आहे. सुपर-१२ फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ सामने जिंकले तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. संपूर्ण स्पर्धेतील जवळपास सारखी कामगिरी पाहता कांगारू आणि किवी संघांमध्ये चुरशीची फायनल अपेक्षित आहे.

बोल्ट, झम्पाचा रोल महत्त्वाचा

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सांघिक कामगिरीवर नजर टाकल्यास अनुक्रमे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि लेगस्पिनर अॅडम झम्पा यांचा रोल महत्त्वपूर्ण ठरेल. डावखुऱ्या बोल्टने ६ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात. त्याला लेगस्पिनर ईश सोढी (६ सामन्यांत ९ विकेट) आणि वेगवान गोलंदाज टिम साउदीची (६ सामन्यांत ८ विकेट) बॉलिंग प्रभावी ठरली आहे. मात्र, न्यूझीलंडला चौथ्या आणि पाचव्या गोलंदाजांची उणीव भासतेय. या दोन बॉलर्ससाठी फिरकीपटू मिचेल सँटनरसह वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने आणि जेम्स नीशॅम यांचा पर्याय कर्णधार केन विल्यमसनसमोर आहे. अॅडम झम्पाला मिचेल स्टार्क (६ सामन्यांत ९ विकेट) आणि जोश हेझलवुड (६ सामन्यांत ८ विकेट) या वेगवान दुकलीची चांगली साथ लाभली आहे.

वॉर्नर, वॅडे, मिचेल, गप्टिलकडे सर्वांचे लक्ष

उपांत्य फेरीत बॅटर मॅचविनर ठरले. त्यात ऑस्ट्रेलियाकडून फॉर्मात असलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वॅडे, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्शकडे सर्वांचे लक्ष असेल. माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ तसेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार आरोन फिंचला किमान फायनलमध्ये सूर गवसेल, असा विश्वास कांगारूंच्या संघ व्यवस्थापनासह चाहत्यांना वाटतो.

किवींचे फलंदाजही तितके फॉर्मात नाहीत. मात्र, अनुभवी मार्टिन गप्टिलसह डॅरिल मिचेल, डेवॉन कॉन्व्हेचे चांगले योगदान राहिले आहे. मात्र, खांदा दुखापतीमुळे कॉन्व्हे हा फायनलमध्ये खेळू शकणार नाही. कर्णधार केन विल्यमसनसह जेम्स नीशॅम, यष्टिरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्स यांना फॉर्मची प्रतीक्षा आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना सूर गवसावा, अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -