गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
बालयुवा दोस्तांनो! हाय! बालदिनाच्या शुभेच्छा! हॅपी चिल्ड्रेन्स डे! भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना बालकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिनाच्या रूपात साजरा केला जातो. हा बालदिन बालकांना संदेश देतो, ‘‘विकसित व्हा.’’
देशातील मुलांचे महत्त्व पाहता, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी, बालदिन साजरा केला जातो. बालमजूर प्रतिबंधक कायदा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणामुळे बऱ्याच ठिकाणी लहान मुले काम करताना दिसतात. त्यामुळे या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, अनेक संस्था कार्यरत असूनही अद्याप सुटलेला नाही. या लहान मुलांची निरागसता जपायला हवी. त्यांच्याजवळ असलेल्या क्षमतेला वाव द्यायला हवा. जसे शक्य होईल, त्याप्रमाणे या बालकांना विकसित होण्याची संधी दिली पाहिजे.
बालयुवा दोस्तांनो, विकसित व्हा. विकसित होण्यासाठी तुम्ही प्रथम स्वतःचा शोध घ्या. व्यक्तिमत्त्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट हा शब्द तुम्ही सर्व क्षेत्रात ऐकला असेल. विकासाच्या १०० पायऱ्या आहेत, त्यातील पहिल्या १५ पायऱ्या या शालेय शिक्षणाशी निगडित आहेत. त्या पायऱ्या महत्त्वाच्या असून प्रत्येकाने चढायलाच हव्यात. अभ्यासासोबत असलेल्या सहशालेय कार्यक्रमांतून अनेक क्षेत्रांतील दालनांची ओळख होते. त्यामागे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असतो. शालेय शिक्षणानंतरच्या ३० पायऱ्या तुमच्यात कौशल्य निर्माण झाले आहे का? हे पाहण्यासाठी असतात. कामासाठी, माहितीसाठी किंवा अन्य कारणांसाठी तुम्हाला लोकांशी संपर्क साधता आले पाहिजे, संवाद करता आला पाहिजे, कोणतीही अडचण, संकट आले असता सारासार विचार करून मार्ग काढता येणं, घरातील छोटी-मोठी कामे करणे, कोणतेही काम नेटाने पूर्ण करणे ही झाली कौशल्य. अशीच अनेक दैनंदिन जीवनाला उपयोगी पडतील, अशी कौशल्ये किंवा स्वनिर्मिती करा आणि विकसित व्हा.
अनेक छोट्या-छोट्या टप्प्यांतून तुम्ही विकसित होत असता. त्याचं उदाहरण म्हणजे, महाविद्यालयातील अंतर्गत वर्गातील क्रिकेट सामन्यात आमच्या वर्गातील संघाला चांगला खेळ करता आला नाही, दुसऱ्या गटातील एकाने अचूक गोलंदाजी करीत आमच्या विकेट्स घेतल्या, म्हणून आम्ही निराश झालो. त्याचा त्यावेळेस रागही आला. काही काळ गेला, तसे दुःख शीतल झाले. काही महिन्यांनंतर जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालय स्पर्धेत त्याच खेळाडूने अचूक गोलंदाजी करून विजयश्री खेचून आणली. सामना संपल्यावर इतरांप्रमाणे मीही त्याला मिठी मारली. एका निवांत क्षणी मी स्वतःशीच हसलो. माझ्यात बदल झाला होता. “माझा वर्ग”पासून “आमचे महाविद्यालय” म्हणजेच “मी”पासून “आमचे” हा विस्तार प्रवास मी अनुभवत होतो. त्याहीपुढे, विरुद्ध गटातल्या खेळाडूचे खिलाडूवृत्तीने अभिनंदन करता आले पाहिजे, हे मी शिकलो. मन मोठं केलं. लहान-सहान गोष्टीत अडकून न राहता, सोडून द्यायला शिकलो. लहान वयात क्षुल्लक करणांवरून झालेली भांडणे, अशा अनेक चुका आज मी सुधारत आहे. समोरच्याची क्षमता आपल्यापेक्षा जास्त आहे, हे स्वीकारायला शिकलो. मित्रांनो, हेच विकसित होणं होय.
मी सर्वत्र पाहाते, बालयुवा दोस्त जेथे जेथे जातात तेथे तेथे त्यांचे औत्सुक्य जागे होऊन लर्निंग प्रोसेस चालू होते; नव्हे ते व्हायलाच पाहिजे. सर्व थरांतील प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखे खूप आहे. प्रत्येकाकडे कुठले तरी कौशल्य असतेच, त्याचे कौतुक करा. कोणत्याही कारणानिमित्ताने जेव्हा एकत्र येता, तेव्हा साद द्या, दाद द्या, मिठी मारा(हग करा), हस्तांदोलन करा, आदराने वागा हे सारे मनापासून अगदी सहजतेने घडायला हवे. अशामुळे तुम्ही लक्षात राहता. मैत्री होते, लोकसंग्रह वाढतो. हेच ‘विकसित होणं’ होय.
२०२०चा झी अॅवॉर्ड पाहताना संकर्षण कऱ्हाडे या कलाकाराने, “माझ्या या बक्षिसात श्रेयस तळपदेचा भाग आहे. त्यांनीही माझ्यासोबत हे पदक स्वीकारावे”, असे बोलून त्यांना व्यासपीठावर बोलावले. नंतरच्या निवेदनात सांगितले, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मला मिठी मारून आपलेसे केले. नवीन आणि ज्येष्ठ यामधील भिंत तोडली, म्हणून माझा अभिनय नंतर फुलत गेला.
ज्येष्ठांनी नेहमीच नवोदितांना हात द्यावा, ही शिकवण नव्हे, कृती म्हणजेच विकसित होणं होय. विद्यार्थ्यांनो, मित्र-परिवारात वावरत असताना, भिन्न संस्कृतीतील, भिन्न आर्थिक परिस्थितील सारे तुम्ही एकत्र येता. त्या वयातील औत्सुक्यानुसार, आपल्याकडील वस्तू बघायला देणं, जमेल तेथे सहकार्य करणे ही खरी मैत्री. अनेक नामांकित व्यक्ती बालपणातील सहकार्याचा किंवा प्राथमिक अवस्थेत धडपडत असताना मित्रांनी केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख करतात. पाहा, क्रिकेटर धोनीवरील चित्रपट एम. एस. धोनी.
सण उत्सवाला एकमेकांच्या घरी जा. घराला, घरातील सदस्यांना नावे न ठेवता त्या घरातले होऊन राहा. एकोप्याने त्या घरात समरस व्हा. मित्राच्या घरातील कोणत्याही अडचणीत हे मित्र एकमेकांना उपयोगी पडतात, हे मी सर्वत्र पाहाते. हेच ‘विकसित होणं’ होय.
आमच्या लहानपणी पेन फ्रेंड याने पत्र-मैत्री होती. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत चार, आठ दिवस एकमेकांच्या घरी राहायला गेल्यावर ओळख व्हायची.
“करी मनोरंजन जो मुलांचे; जडेल नाते प्रभूशी तयांचे” मुले म्हणजे देवाघरची फुले, असे मानणारे, मुलांवर अपरंपार माया करणारे ते साने गुरुजी. बालदिनाला त्यांची आठवण काढल्याशिवाय लेख पूर्ण होऊच शकत नाही. अध्यापक आणि स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजींनी तुम्हा मुलांसाठी लििहलेली पुस्तके वाचा आणि विकसित व्हा.
आज सर्वत्र वयाच्या चाळिशी, पन्नाशीनंतर शाळेतील आठवणी जगविण्यासाठी एक दिवस भेटीगाठीचा कार्यक्रम आखतात. ही गोष्टच बालपणाचे महत्त्व अधोरेखित करते. बालदिनाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे “बालपण जपा” अन् बालपण जपता जपता विकसित व्हा!
mbk1801@gmail.com
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…