अमरावती (वार्ताहर) : गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे.
त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिमांनी शुक्रवारी जिल्ह्यात मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी बंदची हाक दिली होती. पण सकाळी राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली.
पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘सुनियोजित षडयंत्र’
ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटते. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्यावर अशा प्रकारचे मोर्चे काढणे आणि त्यावर हिंदूंची दुकाने जाळायची हे योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘खपवून घेणार नाही’
त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर ते अजिबात खपवून घेणार नाही. यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई करावी. कारवाई न झाल्यास हे प्रकरण हाताबाहेर जाईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटीलांची टीका
पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात, त्यावर आघाडी सरकारचे नेते टीकाही करणार नाहीत का? यामध्ये भाजपचा हात असेल तर तुम्ही तिघे समर्थ आहात भाजपाचा हात कापून काढण्यासाठी, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
कारवाई करू-गृहमंत्री
संपूर्ण राज्यात शांतता आहे. पोलीस विभाग आवश्यक पावले टाकत आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत. कुणी चिथावणी देत असेल तर कारवाई केली जाईल. पण सर्वांनीच सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.