मुंबई (प्रतिनिधी) : जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईने मोठा विक्रम केला आहे. मुंबईत शनिवारी १८ वर्षांवरील वयोगटातील १०० टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. शनिवारी सकाळी मुंबईत ९२ लाख ३६ हजार ५००वी लस देण्यात आली. याचबरोबर सर्व नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे.
मुंबईसह देशभरात १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली. कोविनच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री नऊपर्यंत मुंबईत ९२ लाख ३५ हजार ६८६ जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले होते. मुंबईत लस घेण्यासाठी ९२ लाख ३६ हजार ५४६ नागरिक पात्र आहेत. त्यामुळे पहिल्या डोसचे लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्यास शुक्रवारी केवळ ८६० जणांचे लसीकरण बाकी होते. त्यामुळे शनिवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात झाल्यावर काही तासांतच १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठले गेले. पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण राज्यात प्रथम मुंबईत होत आहे.
जनतेच्या मोठ्या सहभागामुळेच हे शक्य झाले आहे. त्यात राज्य सरकारनेही लसीकरणाच्या धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा दिल्यामुळे पालिकेला वेगाने लसीकरण करता आले, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पहिल्या डोसचे सर्वाधिक ५३ कोटी ६६ लाख ८९५ लसीकरण १८ ते ४४ वयोगटाचे झाले आहे. त्या खालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील २० लाख ४६ हजार, ६० वर्षांवरील सुमारे ११ लाख ७५ हजार आणि आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील ४ लाख २५ हजार नागरिकांनी पहिली डोस घेतला आहे. शुक्रवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार मुंबईत दोन्ही डोसचे एकत्रित १ कोटी ५१ लाख ९६ हजार ९२२ लसीकरण झाले आहे.
मुंबईने पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण आकडेवारीनुसार पूर्ण केले असले तरी यात सुमारे १० टक्के लसीकरण हे मुंबईबाहेरील जनतेचे झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे १०० टक्क्यांचे लक्ष्य पूर्ण झाले असले तरी पहिल्या डोसचे लसीकरण सुरूच राहणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.
आता दुसरा डोस पूर्ण करण्याचे लक्ष्य
दोन्ही डोसांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी अजून ३५ टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. तेव्हा आता यावर अधिक भर दिला जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.