Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीतारापूर औद्योगिक वसाहतीच्या वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वायू प्रदूषणाचे मोजमाप करणारी प्रणाली अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विविध ठिकाणी न बसवल्यामुळे व कार्यान्वित न केल्याने प्रदूषणकारी कारखाने थेट हवेमध्ये कारखान्यातील विषारी वायू सोडत आहेत. त्यामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीसह लगतच्या परिसरामध्ये वायू प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे.

याआधीच तारापूर औद्योगिक वसाहत विविध प्रदूषणांच्या वेढ्यात सापडली आहे. काही कारखान्यांमार्फत मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषण केले जात असल्याने अनेकदा वसाहतीवर राष्ट्रीय हरित लवादासह अनेकांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रदूषणांवर उपाय करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार सूचितही करण्यात आले होते. मात्र प्रदूषण मंडळाची यंत्रणाच अपूरी पडत असल्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. परिणामी, वायू प्रदूषण फोफावत आहे.

औद्योगिक वसाहत परिसराच्या परिघामध्ये अनेक गावे वसलेली आहेत. वायू प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. कर्करोगासारखा भयंकर आजार बळावण्याचीही दाट शक्यता या प्रदूषणामुळे तज्ज्ञांमार्फत वर्तवली जात होती. त्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ या मुद्यांकडे कानाडोळा करून अजूनही वायू प्रदूषण मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतमध्ये लघु, मध्यम व मोठे उद्योग दिवस रात्र धडधडत असतात. उत्पादन प्रक्रिया सुरू असताना यातील काही कारखान्यांमधून वायूचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हे कारखाने प्रदूषण करत असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणारी किंवा देखरेख ठेवणारी कोणतीही यंत्रणा प्रदूषण मंडळामार्फत अमलात आणली गेलेली नाही. त्यामुळे वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. भविष्यात असेच वायू प्रदूषण वाढत राहिले, तर नागरिकांच्या आरोग्यासह त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सालवड, कुंभवली, पास्थळ, पाम, सरावली कोलवडे अशी अनेक गावे आहेत. अनेक कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आखून दिलेली नियमावली न पाळता दूषित वायू, धूर, दुर्गंधीयुक्त धूर थेट हवेत सोडत आहेत. हा धूर व वायू आजूबाजूच्या गावांमध्ये पसरल्याने विविध विषारी व प्रदूषित वायूंमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकदा या गावांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे. मात्र प्रदूषण मंडळाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप ही गावे करत आहेत. वायू प्रदूषणामुळे गावातील झाडे-झुडपे, भाजीपाला बागायतींवर विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना कराव्यात व नागरिकांचे आरोग्य सुधारणाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी या निमित्ताने होत आहे. औद्योगिक परिसरामध्ये वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गस्ती पथक स्थापन केल्यास व कारखान्यांवर नियंत्रण ठेवल्यास वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे येथील नागरिक सांगत आहेत.

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वायू प्रदूषण मोजणारी यंत्रणा गरजेची

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये वायू प्रदूषण होणाऱ्या कारखान्यांमध्ये व क्षेत्राच्या ठिकाणी वायू प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. या यंत्रणेतून दररोज मिळालेली माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संलग्न कार्यालये व जनहितार्थ जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात तसे केले जात नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या सूचनेला येथे केराची टोपली दाखवल्याचे आरोप होत आहेत.

नागरिकांना होतोय प्रदूषणाचा त्रास

तारापूर औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण करत आहेत. अलिकडेच अशाच एका कारखान्याने आपला प्रदूषित वायू हवेत सोडल्यामुळे कोलवडे गावातील नागरिकांना चक्कर येणे, मळमळणे, डोळे जळजळ करणे, अस्वस्थ होणे अशी लक्षणे आढळून आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -