इम्फाळ (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कारातील कर्नल, त्यांची पत्नी व मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार सकाळी जवळपास १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ घडली. या भागातून लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा जात असताना आधीपासूनच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.
कर्नल विप्लव त्रिपाठी (कमांडिंग ऑफिसर – ४६ एआर), त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. शिवाय, या हल्ल्यात आणखी तीन ‘क्विक रिअॅक्शन टीम’ (क्यूआरटी) सदस्यांचाही मृत्यू झाला. जखमींना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात क्यूआरटीमसोबत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीय होेते. राज्याचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी ही घटना ‘भ्याडपणाचे प्रतीक’ असल्याचे सांगत तीव्र निषेध केला.
या हल्ल्यामागे मणिपूरच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा हात असल्याचे सांगितले जात आहे. स्वतंत्र मणिपूरच्या मागणी करत १९७८मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. भारत सरकारने या संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित केले आहे. मणिपूरमध्ये या संघटनेकडून भारतीय सुरक्षादलावर वारंवार हल्ले करण्यात येतात.