संजय भुवड
महाड : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाला लागून असणाऱ्या केंबुर्ली गावातील ग्रामस्थांना नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. केंबुर्ली गावासाठी बारमाही पाणीपुरवठा करणारी विहीर चौपदरी करण्याच्या कामात बुजवली गेल्याने, डोंगरातील पावसाळी झऱ्याचे पाणी जेमतेम ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवठ्यास येत असल्याने व गांधारी नदीवरील जॅकवेलमधील पाणी अद्याप सोडले नसल्याने या गावातील जनतेला नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, दर दिवशी पैसे मोजून पाण्याचा टँकर प्रत्येक घरी बोलावून आपली तहान या ग्रामस्थांना भागवावी लागत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये सोडण्यात येणारे जॅकवेलचे पाणी नोव्हेंबर महिन्यातच सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या केंबुर्ली या एक मोहल्ला व तीन वाड्या मिळून सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाच्या बाजूला असलेल्या विहीरीतील पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र चौपदरीकरणाच्या कामात विहीर बुजवली गेल्याने इतर वापर व पिण्याच्या पाण्यासाठी केंबुर्ली ग्रामस्थांना पावसाळी झऱ्याचे पाणी व गांधारी नदीवरील जॅकवेलचे पाणी यावर अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी ऑक्टोबर अखेरलाच पावसाळी झऱ्याचे पाणी आटल्याने नोव्हेंबरमध्येच ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दुसरीकडे, गांधारी नदीवरील जॅकवेलचे पाणी अद्याप सोडले नसल्याने ग्रामस्थांना टँकर मागवून आपली तहान भागवावी लागत आहे. मात्र सर्व सामान्य गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील जनतेला रोज विकतचे पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेकांची पाण्यावाचून फरफट होत आहे.
जॅकवेलचा पाणीपुरवठा सुरू करा
झऱ्याचे पाणी मिळवण्यासाठी तासन् तास खर्च करावे लागत आहेत. गांधारी नदीवरील जॅकवेलमधून गावाला जोडलेल्या पाणीपुरवठा योजना केवळ नावापुरत्याच असून अनेकदा मागणी करूनही जॅकवेलचा पाणीपुरवठा सुरू केला जात नाही. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी परवड थांबवण्यासाठी लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.