आमदार नितेश राणे यांचा परिवहन मंत्री परब यांच्यावर घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या सहा दिवसांहून अधिक काळ सुरू असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मुंबईमधील आझाद मैदान येथे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. असे असतानाच या ठिकाणी शुक्रवारी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. राज्यातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी मी आलो असून भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असा शब्द आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना नितेश राणे यांनी यावेळी दिला. तसेच ‘एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले, तर त्यात कर्मचाऱ्यांचे हित आहे. पण भ्रष्टाचार करणाऱ्यांची दुकानदारी मात्र बंद होईल’, असा घणाघात नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला. तसेच संपात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्यास गाठ राणेंशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. मागील आठ वर्षांपासून परिवहन खाते हे शिवसेनेकडे आहे. या कालावधीत तुम्ही काय केले? असा सवाल राणे यांनी केला. मंत्रालयातील स्वत:च्या कार्यालयात बसून नुसते बोलू नये. एकदा आझाद मैदानात या, असे आव्हान त्यांनी दिले. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे जर ऐकले नाही, तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरकारला दिला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी हवे असल्यास अधिवेशन मुंबईतच बोलवा, नागपूरला नको, असे ते म्हणाले. ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही, त्यासाठी रक्तही तसे असावे लागते, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कितीही एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करा, आता मागे हटणार नाही, आर-पारची लढाई लढू, अशा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला.
कुटुंबीयांनी केला थाळीनाद
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि राज्य सरकारचा आंदोलन संपवण्याचा प्रयत्न यात कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय भरडले जात आहेत. आधीच महागाईभत्ता आणि अॅडव्हान्स पे, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिलेला नाही. त्यातच पगारात नेहमीच होणारी अनियमितता. यामुळे कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचा जीव मेटाकुटीला आला आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुबांनीही आंदोलनाच्या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेटमधील एसटी कॉलनी येथे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सकाळी थाळीनाद केला. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण यात सहभागी झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंब सण समारंभही साजरे करु शकत नाहीत.
एसटीच्या आंदोलनाला वडापवाल्यांचा देखील पाठींबा
रत्नािगरी (वार्ताहर) : रत्नािगरी जिल्ह्यातील एसटी सेवा सलग पाचव्या दिवशीदेखील पूर्णपणे बंद होती. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी सर्व कर्मचारी आंदोलनात उतरले असून या आंदोलनाला जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतून शुक्रवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सरकारने योग्य तो तोडगा न काढल्यामुळे जनतेचे हाल झाले आहेत, तर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया राज्य सरकारविरोधात उमटू लागल्या आहेत. रत्नािगरी परिवहन उपविभागात अनेक एसटी गाड्या गेले ५ दिवस जागेवरून हललेल्या नाहीत. जे अिधकारी, कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत.
पुणे, नाशिकनंतर सांगलीतही खासगी शिवशाही सुरू
सांगली : पुणे आणि नाशिक नंतर आता सांगलीतही खासगी शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. तसेच सांगली आगाराच्या गेटसमोर बसलेल्या एसटी कर्मचारी आंदोलकांनाही हटवण्यात आले आहे. सांगली-पुणे मार्गावर शिवशाही बस सेवा सुरू केल्यानंतर आता इतर मार्गांवरही शिवशाहीची बस सेवा सुरू केली जाणार असल्याचे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.






