संजय कुळकर्णी
जागतिक रंगकर्मी दिवस हा रंगकर्मी दरवर्षी साजरा करतो. त्याला एक वैशिष्ट्य आहे. तो कलाकारांचा एक हक्काचा दिवस असतो. त्या दिवशी कलाकार एकत्र येतात आणि आपले मनोगत व्यक्त करतात. प्रेक्षकांना सुद्धा त्या दिवशी समाविष्ट करून घेतले जाते. मराठी नाट्य कलाकार संघ दरवर्षी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा करीत आलाय. लॉकडाउनच्या काळात तो साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र तो २५ नोव्हेंबरला प्रबोधनकार नाट्यगृहात साजरा होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत तो साजरा होत असून त्यांचा संदेश रंगकर्मींना मिळणार आहे. तसेच त्या दिवशी कलाकार दत्तक योजनेचा शुभारंभ होणार आहे.
ज्येष्ठ संगीत रंगभूमीवरील अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला २०१४ साली यशवंत नाट्य मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा करण्यात आला. सलग ७ वर्षे त्या सोहळ्यास खंड पडलेला नव्हता. कोरोनाच्या महामारीमुळे त्यानंतर तो साजरा झाला नाही पण आता सर्व सुरळीत झाल्यामुळे मान्यवरांच्या साक्षीनं तो होणार असून यंदाचे ८ वे वर्ष आहे. रंगभूमीची कैक वर्षे ज्यांनी सेवा केली आहे अशा रंगकर्मीची सन्मानमूर्ती म्हणून निवड ही केली जाते. गेल्या ७ वर्षांत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, किशोर प्रधान आणि दिलीप प्रभावळकर यांची निवड केली गेली होती. यंदाच्या वर्षीचे सन्मानमूर्ती आहेत अशोक सराफ. सन्मानमूर्ती यांनी दिलेल्या संदेशाचे प्रत्येक नाट्यगृहात त्या दिवशी आणि पुढच्या संपूर्ण आठवड्यात वाचन केले जाते असा प्रघात आहे. नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून यंदा कलाकार दत्तक योजनेचा शुभारंभ होत आहे. रंगभूमीची ज्यांनी अनेक वर्षे सेवा केली असे काही कलाकार जे सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत अशा गरजू कलाकारांना दत्तक घेऊन त्यांचा भार हलका करावा म्हणून ही कलाकार दत्तक योजना.
या योजने अंतर्गत काही सक्षम कलाकार एक एक व्यक्ती दत्तक घेतील आणि प्रत्येक वर्षी मराठी नाट्य कलाकार संघाला १८ हजार रुपये देतील आणि त्यातून दर महिन्याला दीड हजार रुपये दत्तक घेतलेल्या रंगकर्मींच्या खात्यात जमा होतील. वंदना गुप्ते, अर्चना नेवरेकर, सुभाष सराफ, अजित पाटील, सुषमा दळवी, ज्ञानेश पेंढारकर, वर्षा राणे, शर्मिला माहूरकर आणि सुनील बर्वे, सुबोध भावे अशा आतापर्यंत ११ जणांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. के. राघवकुमार, वसंत इंगळे, वसंत अवसरीकर, मंदा देसाई, उपेंद्र दाते, जयमाला इनामदार, मधुकर केळुस्कर, उल्हास सुर्वे आणि बाबा पार्सेकर हे दत्तक योजनेतील रंगकर्मी आहेत. २५ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रबोधन नाट्यगृहात हा सोहळा साजरा होणार असून नाट्यसंगीत, नृत्य – नाट्य आणि मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे.