मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाने २२७ वरून २३६ नगरसेवकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यात सर्वच पक्षांचे लक्ष हे पश्चिम उपनगराकडे लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील सत्तेचे गणित पश्चिम उपनगरातील संख्याबळावर निश्चित होईल असा अंदाज बांधला जात आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. यासाठी राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढवून २३६ केली आहे. भाजपने याला विरोध केला असून शिवसेना राजकीय हेतूंसाठी, निवडणूक जिंकण्यासाठी हे करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान महापालिकेचे एकूण नगरसेवक हे २२७ आहेत. यापैकी सर्वात जास्त म्हणजे १०२ प्रभाग हे पश्चिम उपनगरात आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली असली तरी नक्की कुठला प्रभाग वाढवला जाणार? याची अद्यापही माहिती नसल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष पश्चिम उपनगराकडे लागले आहे.
ऑक्टोबरमध्ये पालिका प्रशासनाने मुंबईतील प्रभागांच्या फेररचनेचा कच्चा आराखडा तयार करून निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यावर शिवसेना सोयीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला होता.