केवळ १५ इमारती सील
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता सील बंद केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत पूर्ण सील केलेल्या इमारती या आता केवळ १५ असल्याचे समजते.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तर कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही पालिकेने थोपवली असून सध्या मुंबईतील रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर दिसत आहे. मात्र असे असताना वर्षा अखेरपर्यंत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
वर्षाअखेर पर्यंत सण किंवा त्यामुळे होणारी गर्दी पाहता पालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दिवसभरात २६२ रुग्णांची नोंद
दरम्यान मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही २६२ आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही २९०६आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आणि रूग्ण दुपटीचा दर २१३६ दिवस आहे. तसेच पूर्ण सील केलेल्या इमारती या केवळ १५ आहेत तर कंटेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळींमध्ये शून्य असल्याचे समोर आले आहे.