Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीनवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी संबंध असल्याचा केला आरोप

चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूर (वार्ताहर) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘नवाब मलिक यांना आम्ही कोणत्याही गावात फिरू देणार नाही. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे. इतकेच नाही, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे’, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर पाटील यांनी मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्याबाबतीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे ‘आ बैल मुझे मार’, असे असते. ‘आ बैल मुझे मार’, हे त्यांनी स्वत:हूनच मान्य केलेले आहे. ज्यांना टाडाखाली अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी जप्त होणारी त्यांची जमीन, मलिक यांनी दोन दिवस आधीच त्यांच्याकडून अंडरस्टँडिगने स्वस्तात घेतली, असे पाटील म्हणाले.

पाटील यांनी उदाहरण देताना सांगितले की, ‘एसटीमध्ये मी प्रवास करतो. माझे मुन्ना महाडिकांना दोनशे रुपये द्यायचे होते. तेवढ्यात एसटीत चोर शिरतो. मला माहीत आहे की, आता चोर सगळ्यांचे पैसे काढून घेणार आहे. हे ओळखून मी मुन्ना महाडिक यांचे दोनशे रुपये पटकन देऊन टाकतो. माझ्या दोनशे रुपयांची फिट्टमफाट झाली. याप्रमाणे जसे दोन दिवसांनंतर टाडा लागणार होता आणि जमीन जप्त होणार होती, ती जमीन मलिक यांनी स्वस्तामध्ये घेतली हे त्यांनी मान्य केले आहे. म्हणून ‘एनआयए’मार्फत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांना ‘एनआयए’ने ताबडतोब चौकशीसाठी बोलवावे आणि हा देशद्रोह असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी यांचे संबंध आहेत’. दरम्यान, बॉम्बस्फोटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी आपले संबंध नसल्याचे मलिक यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.


इतकी मुजोरी कुठून येते?…

‘मला कळत नाही की इतकी असंवेदनशीलता, मुजोरी कुठून येते? जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस अन्याय करा, अत्याचार करा. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही खासगी बसेस आणता. मेस्मा कायद्याखाली नोटिसा बजावता. महामंडळ, राज्य सरकारमध्ये सामील करण्यासाठी वेळ लागेल, असे तुम्ही म्हणता. त्या मागणीवर नंतर चर्चा करा. पण त्यांचे १७ महिन्यांचे पगार द्यायचे आहेत, त्याचे काय?’ असेही पाटील म्हणाले.

ठाकरे सरकारी रुग्णालयात का नाही गेले?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मानेच्या दुखण्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना खासगी रुग्णालयात दाखल होण्यावरून टोला लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालये सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होत आहे. मला वैयक्तिक टीका करायची नाही, पण फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते.

राज्य सरकार पेट्रोलचे दर कमी का करत नाही?

‘राज्यातील सत्तेतील तीन पक्ष पेट्रोल – डिझेलचे कर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते. सगळा स्टंट होता. आता केंद्राने पेट्रोल-डिझेलवरचा अबकारी कर कमी केला. त्यातून पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल १० रुपये प्रतिलिटर स्वस्त झाले. त्यामुळे प्रत्येक राज्यात अजून एकेक रुपया कमी झाला. त्यानंतर ११ राज्यांनी दर कमी केले. त्यात काँग्रेस शासित राज्ये देखील आहेत. महाराष्ट्रात हा व्हॅट पेट्रोलवर २४ टक्के आणि डिझेलवर २५ टक्के आहे. त्याशिवाय ९ टक्के अतिरिक्त सेस आहे. आता बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा ५-१० टक्के व्हॅट का कमी करत नाही? कारण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे’ असे पाटील म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -