संतोष वायंगणकर
गेल्या वर्ष-दीड वर्षात महाराष्ट्रावर अनेक प्रकारची संकटे आली आहेत. कोरोना, त्यानंतर निसर्ग आणि तौक्ते वादळ आले. मधे अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोकणात आलेल्या पुराने अनेकांच्या संसाराची वाताहत झाली आणि अनेकांचे बळीही घेतले आहेत. आजही उद्ध्वस्त झालेले संसार उभे राहिलेले नाहीत. शासनाकडून कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. शासनाकडून आश्वासनांची बरसात झाली; परंतु आश्वासनांच्या बरसातीत मात्र कुठेही वास्तवता नव्हती. फक्त सरकारकडून आश्वासन देऊन आपद्ग्रस्तांना गप्प बसवायचे होते. आपणच पूरग्रस्तांचे तारणहार आहोत, अशी वातावरणनिर्मिती करणारे शासनकर्ते कुठे धावूनही गेलेले नाहीत. ज्यांचे प्रचंड नुकसान झाले असे नुकसानग्रस्त मात्र केवळ प्रतीक्षा करत राहिले.
आजही अनेकांना शासनाची कोणतीही मदत उपलब्ध झालेली नाही. वास्तविक ज्यांनी शेतकऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले होते, त्यातला कुणीही साधी विचारपूसही करताना दिसत नाही. विमा कंपन्यांनी तर झालेली नुकसानभरपाई कशी देता येणार नाही, यासाठीच प्रयत्न चालविले आहेत. अनेक अटी, शर्तींच्या आणि कागदपत्रांच्या जंजाळात गुरफटून त्या नुकसान झालेल्याला कोणतीही मदत मिळणार नाही, याची पूर्ण व्यवस्थाच या विमा कंपन्यांनी केली आहे. विमा कंपन्यांनी व्यावसायिकांची अडवणूक चालवली आहे. त्यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही. खरंतर या विमा कंपन्यांवर कुणाचाही अंकुश नाही. यामुळेच विमा उतरवूनही व्यावसायिकांना कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही आणि दिलेही जात नाही.
निसर्गाचा कोप कधी, कसा होतोय हे समजत नाही. एकामागोमाग एक अशी संकटांची मालिका सुरूच आहे. एकातून सावरायचं, त्यापाठोपाठ दुसरं संकट उभं असत. तरीही कोकणातील शेतकरी, सामान्यजन यातून उभा राहण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणूनच जरी संकट आली तरी कोकणातील शेतकरी असो की, आणखी कोणी डगमगून जात नाही. कोणताही अविचार मनात येऊ न देता आलेल्या संकटातही ठामपणाने उभा राहण्याचा निर्धार तो करतो, उभा राहातो. म्हणूनच शेती, बागायतीला आग लावण्याचे किंवा शेती, बागायती स्वत:च उद्ध्वस्त करण्याचे दृश्य कोकणातील शेती बागायतीत कधी दिसत नाही. यामागेही कमालीची सकारात्मकता असते. प्रसंगातून, संकटातून हिमतीने उभे राहण्याची त्याची मानसिकता असते. हीच मानसिकता कोकणातील माणसाला पुढे घेऊन जाते.
यावर्षी मधल्या काही कालावधीत भरपूर पाऊस पडला. या झालेल्या पावसाने शेती बागायतीचे फार मोठे नुकसान झाले होते. आता तर अवकाळी पाऊस कोसळला आणि भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. भातशेतीत पाणी साचल्याने भातशेती या अवकाळी पावसाने पाण्याखाली गेली आहे. पाण्यात तयार झालेली भातशेती गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील उशिरा पिकणाऱ्या भातशेतीत नुकसान झाले आहे. तसेच इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसात कोकणातील गावोगावच्या भातशेतीत पाणी शिरल्याने ती भातशेती पुन्हा उभी राहणारच नाही. त्यातून नुकसान ठरलेलेच होते. कोकणातील कृषी विभागाकडून या शेतीच्या नुकसानाचा सर्व्हे झाला पाहिजे; परंतु कोकणातील कृषी विभागाला वाटते की, काही नुकसानच झालेले नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शासकीय अधिकाऱ्यांचे हे असे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही मदतीचा हात मिळेल, तर तसे काही घडू नये, याची व्यवस्थाच करण्याचा त्यांना प्रयत्न असतो. यामुळे अवकाळी पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी.
कोकणातील शेतकऱ्याला भातशेतीच्या नुकसानाची कधीच काही भरपाई मिळत नाही. शासनाकडून आजवर कधीही कोकणातील शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही. कोकणातील शेतकऱ्यांनीही कधी प्रयत्नही केलेले नाहीत. शासनदरबारी कधी आवाज उठवला नाही की, काही मागितले नाही. संपूर्ण शेती यावेळी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळायला हवी. कोकणातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट आले आहे. या संकटातून कोकणातील शेतकरी सावरला पाहिजे. शासनाकडून नुकसानभरपाईचा आधार मिळाला पाहिजे.