
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले. त्यातच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणी बाग पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. दरम्यान १० दिवसांत ५० हजार ७९६ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली आहे.
कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर १ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू करण्यात आली आहे. १ ते १० नोव्हेंबर या १० दिवसांत तब्बल ५० हजार ७९६ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. या १० दिवसांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या माध्यमातून तब्बल २१ लाख १८ हजार ३७५ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
गेल्यावर्षी २३ मार्च २०२० पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१पासून उद्यान पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि ४ एप्रिलपासून पुन्हा उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्ण आटोक्यात आल्याने निर्बंधही शिथिल करण्यात आले असून उद्यान व प्राणिसंग्रहालय १ नोव्हेंबरपासून पुन्हा खुले करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर सकाळी ६ ते ८.३० पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी उद्यान खुले राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.