Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गात हजारो कोरोना टेस्ट रिपोर्ट पेंडिंग

सिंधुदुर्गात हजारो कोरोना टेस्ट रिपोर्ट पेंडिंग

सरकारच्या गलथान कारभाराचा आ. नितेश राणेंनी केला भांडाफोड

कणकवली (प्रतिनिधी) : कोरोना काळात रेड झोन मध्ये असलेला सिंधुदुर्ग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र ३ नोव्हेंबर पासून आजपर्यंत २ हजार आरटीपीसीआर टेस्टचे सॅम्पल तसेच पडून आहेत. त्याचे रिपोर्ट अद्याप मिळाले नसल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागासाठी जी खरेदी झाली त्याचे ऑडिट झाले पाहिजे. अहमदनगरमध्ये रुग्णालयाला नुकतीच आग लागली. अशा घटना भविष्यात जिल्हा रुग्णालयातही होऊ शकतात. कारण जी खरेदी कोरोना काळात झाली त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोना काळात १६ कोटी, २० कोटी, २२ कोटी अशी जी मोठी खरेदी झाली आहे. त्यातील बहुतेक गोष्टी फक्त कागदावरच आहेत. ती साधनसामुग्री प्रत्यक्षात उपलब्ध नाही. कोरोना काळात जी काय खरेदी झाली आहे त्याची एक‘श्वेत पत्रिका’ निघालीच पाहिजे आणि त्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करावी. पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतःहून ही ‘श्वेत पत्रिका’ जाहीर करावी, असे आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिले.

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राणे म्हणाले, कोरोना काळात आम्ही आमदारांचा निधी आरोग्यासाठी दिला आहे. तो निधी आणि शासनाने दिलेला निधी यातून खरेदी केलेल्या वस्तू आणि यंत्र सामुग्री प्रत्यक्ष दाखवा; मात्र हे प्रशासन आणि सत्ताधारी असा पारदर्शक कारभार दाखवू शकणार नाहीत. जसे वानखेडेंच्या कपडे, बूट आणि घड्याळांवर बोलता तसे खूप लोकांचे कपडे आणि गाड्या या जिल्हा रुग्णालयात तयार झालेले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

मेडिकल कॉलेजसाठी आमची मदत घ्या…

शासकीय मेडिकल कॉलेजच्या नावाने गवगवा करताना केंद्र शासनाने परवानगी नाकारली तर मात्र राणे साहेब केंद्रात मंत्री असल्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी नाकारल्याचा कांगावा शिवसेनेचे नेते करत आहेत. केंद्राच्या समितीने परवानगी नाकारताना अधिकृत प्रोफेसर वर्गातील स्टाफ न भरल्याचे कारण नमूद केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोफेसर, डेप्युटेशनवर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखविण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय कमिटीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करावी. त्यासाठी आमच्या अनुभवाची मदत देऊ शकतो. हे कॉलेज सर्व जनतेचे आहे. त्यामुळे केवळ निवेदने फिरवत राहू नका. दिल्लीत तुमची काय अवस्था झालेली असते ती सर्वानाच माहीत आहे, अशी टीका आ. राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

जिल्हाधिकारी राजशिष्टाचार पाळत नाहीत…

‘आम्ही आव्हान दिले म्हणून तरी डीपीडीसीची मिटिंग लावली आहे. डीपीडीसीची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होणार नाही’, असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाधिकारी राजशिष्टाचार पाळत नाहीत. शासकीय आढावा बैठकीत कोण बसावे कोण नाही हे घटनेने सांगितलेले आहे. ते जर पायदळी तुडवत असतील तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आम्हाला पालकमंत्र्यांना अडविण्याची हौस नाही, अडवणे हा हेतू सुद्धा नाही. मात्र जिल्ह्यातले प्रश्न, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी थांबवत असू आणि पालकमंत्री म्हणून ते थांबून ऐकूण घेणार नाहीत काय? आणि ते थांबणार नसतील तर मग अडवावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. एसटीच्या संपाला भाजपाचा पूर्ण पाठींबा आहे. न्यायालयासमोर मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्या नावाने सुसाईड नोट लिहिल्या आहेत. सत्ताधारी स्वतःच्या मुलांसाठी धावतात, एसटी कामगारांच्या मुलांसाठी यांना वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -