मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून होत असलेली कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडेंवर होत असलेले आरोप, अँटेलिया प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा पोलिसांना मिळालेला ताबा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून होणारी चौकशी अशा विविध प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांची भूमिका कशी असावी हे निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी धाव घेतली. तेथे त्यांनी पवार यांच्याशी साधारण अर्धा तास चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर पवार यांनी थेट गृहमंत्री वळसे – पाटील यांचे निवासस्थान गाठले. तेथे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. तेथे तिघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर कोणीही अधिकृतपणे काहीही माहिती दिली नसली तरी केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवायांना निष्प्रभ करण्यात मुंबई पोलीस कशी भूमिका बजावू शकतात, याबद्दल यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.