Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाबटलर विरुद्ध बोल्ट

बटलर विरुद्ध बोल्ट

पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडसमोर आज न्यूझीलंडचे आव्हान

अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत बुधवारी (१० नोव्हेंबर) माजी विजेता इंग्लंडसमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. सुपर-१२ फेरीतील समसमान कामगिरी पाहता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उभय संघांमध्ये चुरस आहे. त्यात इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जोस बटलर विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असा सामना अपेक्षित आहे.

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ दुसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. शेवटच्या साखळी फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात खाल्लेल्या इंग्लंडने सुरुवातीचे सामने जिंकून विजयाचा चौकार लगावला आहे. त्यांची दोन्ही आघाड्यांवरील कामगिरी चांगली आहे. आघाडीचा फलंदाज जोस बटलरने पाच डावांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याच्यानंतर केवळ जेसन रॉयला हाफ सेंच्युरी मारता आली. दुखापतीमुळे रॉय उर्वरित सामन्यांत खेळणार नसला तरी इंग्लंडकडे चांगला बॅकअप आहे. त्यासाठी कर्णधार इयॉन मॉर्गन, सलमीवीर डॅविड मॅलन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअर्स्टो तसेच अष्टपैलू मोईन अलीला फलंदाजीत जास्तीत जास्त योगदान द्यावे लागेल.

फलंदाजीच्या तुलनेत इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. लेगस्पिनर अब्दुल रशिदने ५ सामन्यांत आठ विकेट घेतल्यात. ऑफस्पिनर मोईन अलीसह डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने प्रत्येकी सात विकेट टिपताना त्याला चांगली साथ दिली आहे. सेमीफायनलमध्ये मिल्सची अनुपस्थिती जाणवेल. त्याच्या गैरहजेरीत ख्रिस जॉर्डन आणि ख्रिस वोक्स या वेगवान दुकलीसह लियामस्टोनला अधिक प्रभावी गोलंदाजी करावी लागेल.

२०१९ वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील निसटत्या पराभवाच्या आठवणी ताज्या असल्या तरी न्यूझीलंडसाठी यंदा इंग्लंड लकी ठरले. साउथम्पटनमध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतावर मात करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर झटपट क्रिकेटमध्येही किवींनी सातत्य राखले.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ फेरीत ग्रुप २मध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव वगळता केन विल्यमसन आणि कंपनीने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गोलंदाजी ही किवींसाठी जमेची बाजू आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट चांगलाच फॉर्मात आहे. त्याने ५ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात. त्याला टिम साउदी (७ विकेट) आणि लेगब्रेक ईश सोढी यांची (७ विकेट) चांगली साथ लाभली आहे. न्यूझीलंडला चौथ्या गोलंदाजाची उणीव भासत आहे.

गोलंदाजांनी तारले तरी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. केवळ मार्टिन गप्टीलला अर्धशतकी मजल मारता आली आहे. त्यानंतर डॅरिल मिचेल (४९ धावा)आणि कर्णधार विल्यमसनच्या (४० धावा)सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत. डेवॉन कॉन्व्हेसह ग्लेन फिलिप्सने निराशा केली आहे. सांघिक कामगिरीत सातत्य राखण्यासाठी बॉलर्सना बॅटर्सची चांगली साथ मिळणे अपेक्षित आहे.

इंग्लंडला हरवण्याचा बोल्टला विश्वास

उपांत्य फेरीत इंग्लंडला मात देऊ, असा विश्वास ट्रेन्ट बोल्टने व्यक्त केला आहे. माझ्या मते आम्हाला आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला एका चांगल्या संघाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत आम्ही सर्व क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल, असे बोल्टने म्हटले आहे.

बोल्टने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्याचाही यावेळी उल्लेख केला. इंग्लंड संघात सर्वच मॅचविनर क्रिकेटपटू आहेत. या वेळेसही ते चांगले खेळत आहे. आम्ही एक मोठा उलटफेर करू शकतो. मागच्या काही वर्षांत दोन्ही संघांचा इतिहास चांगला आहे, असेही त्याला वाटते.

इंग्लंड आणि न्यूझीलंड २०१९ वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होती. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. नियोजित सामन्यानंतर सुपर ओव्हरमध्ये धावसंख्या समान राहिली. शेवटी चौकाराच्या (बाउंड्रीज्) आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -