मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधान परिषदेच्या आठ सदस्यांची मुदत येत्या एक जानेवारीला संपत असून त्यातील सहा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
सोलापूर तसेच अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या जागांसाठी नंतर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होणार आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून रामदास कदम, भाई जगताप, कोल्हापूरमधून सतेज पाटील, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, अकोला-वाशिम-बुलढाण्यातून गोपीकिशन बाजोरिया, नागपूरमधून गिरीश व्यास, सोलापूरमधून प्रशांत परिचारक, अहमदनगरमधून अरूण जगताप यांच्या सदस्यत्वाची मुदत एक जानेवारीला संपत आहे.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ज्या जिल्ह्यांतील ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत आहेत, तेथेच निवडणूक घेता येते. त्यामुळे अहमदनगर तसेच सोलापूर येथे सध्या निवडणूक होणार नाही. उरलेल्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांबाबात १६ नोव्हेंबरला अधिसूचना जारी होईल. २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. २४ नोव्हेंबरला त्यांची छाननी होईल. २६ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येतील. १० डिसेंबरला मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.