Wednesday, July 9, 2025

विरार स्मशानभूमीतील चिमणी बंद असल्याने संपूर्ण परिसरात धूर

विरार स्मशानभूमीतील चिमणी बंद असल्याने संपूर्ण परिसरात धूर


नालासोपारा (वार्ताहर) : विरार पश्चिमेतील स्मशानभूमीमध्ये सुविधांची कमतरता असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. स्मशानातली चिमणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने मृतदेह जाळल्यानंतर धूर वर न जाता संपूर्ण परिसरात पसरत आहे. यामुळे नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे.


पावसाळ्यात आलेल्या वादळ वाऱ्यामुळे विरार पश्चिमेला असलेल्या स्मशानभूमीचा पत्रा निघाला होता. त्यानंतर या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची सतत मागणी करण्यात येत होती. मात्र, वारंवार नागरिकांकडून मागणी करूनही या स्मशानभूमीची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. पत्र्याप्रमाणेच या स्मशानभूमीची चिमणीसुद्धा खराब झाली असून गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.


प्रत्येक स्मशानभूमीमध्ये एक चिमणी बसवलेली असते, जेणेकरून मृतदेह जाळल्यानंतर धूर सर्वत्र न पसरता वरच्या दिशेला जावा. मात्र, या स्मशानभूमीची चिमणीच खराब झाल्याने मृतदेह जाळल्यानंतर धूर सर्वत्र पसरतो. अनेकदा या स्मशानभूमीची डागडुजी केलेली आहे. परंतु, कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेची असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणे व स्मशानभूमीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.



सर्वांनाच होतोय धुराचा त्रास


या स्मशानभूमीच्या आजूबाजूला वस्ती, दुकाने, दवाखाने, खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. खाद्यपदार्थांवर हा धूर बसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच दवाखानाही याठिकाणी असल्याने रुग्णांनासुद्धा या धुराचा त्रास होऊ शकतो. स्मशानभूमीच्या समोरच मैदान असल्याने लहान मुले खेळत असतात. या धुरामुळे त्यांनाही दम्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. हा धूर मृतदेह जळल्याचा असल्याने या धुरासोबतच दुर्गंधीसुद्धा पसरत आहे. नागरिकांना धुरामुळे कोणता रोग होऊ नये याची भीती सतावत आहे.



धूर येत असल्याने खाद्यपदार्थ घ्यायलाही कोणीही येत नाही. लोकांना आजार होण्याची भीती असते. तसेच मी संपूर्ण दिवस दुकानात बसून असल्याने मलासुद्धा या धुराच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. - आशीष मोहिते, दुकानदार



काळा धूर संपूर्ण परिसरात पसरत असतो. कधी जास्त मृतदेह असले तर संपूर्ण दिवस धूर सुरू असतो. अशा धुरामुळे आम्हाला दमा होण्याची शक्यता आहे. - रमेश गोसावी, सामान्य नागरिक

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा