Tuesday, November 5, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिका कमनशिबीच!

दक्षिण आफ्रिका कमनशिबीच!

रोहित गुरव (मुंबई) : क्षेत्ररक्षणाचा देव जॉन्टी ऱ्हाेड्स, विलक्षण नेतृत्वगुण असलेला हॅन्सी क्रोनिए, सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता असलेले ज्याक कॅलिस, लान्स क्लुजनरसारखे अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजांना घाम फुटायला लावणारे हर्षेल गिब्ज, गॅरी कर्स्टनसारखे धडाकेबाज सलामीवीर आणि शॉन पोलॉक, अॅलन डोनाल्ड, मखाया एन्टिनीसारखे प्रतिस्पर्धी फलंदाजांना सतावणारे वेगवान गोलंदाज अशा प्रतिभावंतांची मांदीयाळी दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली. अलीकडच्या काळातील बोलायचं झालं तर एबी डेविलियर्स, ग्रॅमी स्मिथसारखे दिग्गज आफ्रिकेसाठी जीवतोड खेळले. पण विश्वचषक किंवा आयसीसीच्या अन्य कुठल्याही स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्याचे भाग्य दक्षिण आफ्रिकेला आजवर कधीच लाभले नाही. क्रिकेटचा उद्गाता इंग्लंडही आफ्रिकेसारखाच कमनशिबी होता; पण झटपट क्रिकेट त्यांना पावले आणि इंग्लंडने एकदाचा विश्वचषकाचा खिताब पटकावला.

वनडे (५० षटकांची) विश्वचषक स्पर्धा मानाची समजली जाते. त्यात विश्वचषक जिंकणे म्हणजे नशीबवानच. या स्पर्धेने दक्षिण आफ्रिकेकडे कायम मान फिरवलेलीच. पण ही कसर टी-ट्वेन्टी या झटपट प्रकारात तरी भरून काढण्याची संधी होती. त्याचेही सोने आफ्रिकेला करता आलेले नाही. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया हे संघ टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानले जात होते. दक्षिण आफ्रिका हा संघ त्यांच्या पंक्तीत नव्हताच. पण म्हणतात ना दुर्लक्ष असणारे अनपेक्षित कामगिरी करून जातात. अगदी तसेच यंदाच्या विश्वचषकात घडले. पाकिस्तान पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही तगड्या संघांना धक्के दिले. पराभवात पण शान असावी लागते. त्याचा प्रत्यय यूएईत सुरू असलेल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यातून दक्षिण आफ्रिकेने जगाला दिला. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात अवघ्या ११८ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियालाही घाम फुटला. कांगारूंना विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंजावे लागले हे विशेष. पहिल्याच घासाला खडा लागल्यानंतर मग आफ्रिकेने गटातील सामन्यांत मागे वळून पाहिले नाही. वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना एकापाठोपाठ धक्के देत प्रबळ दावेदार असणाऱ्या इंग्लंडवरही मात केली. त्यामुळे यंदा तरी विश्वचषक विजयासाठीची कोंडी दक्षिण आफ्रिका फोडेल, असे वाटत होते. इथे रनरेट आडवा आला आणि ५ पैकी ४ सामने जिंकूनही ८ गुणांसह बरोबरीत असताना दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर जावे लागले.

आजवर वर्ल्डकप स्पर्धांमधील दक्षिण आफ्रिकेचा इतिहास पाहिला तर महत्त्वाच्या सामन्यांत मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याचे दिसते. कधी पकडलेला झेल उडवून पुन्हा पकडण्याच्या नादात सुटून सामना गमवावा लागला तर कधी चांगल्या खेळाडूंना निर्णायक सामन्यांत आलेले अपयश. अशा दुखावणाऱ्या आठवणींचा इतिहास आफ्रिकेचा आहे. त्यात यंदाही खंड पडलेला नाही.

एकतर दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषक विजयाचे स्वप्न तर अधुरे राहिले; त्याबरोबर वर्णद्वेषाचे वादग्रस्त प्रकरणही पुन्हा चव्हाट्यावर आले. याच प्रकरणात यष्टीरक्षक आणि अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉकला एक सामना खेळता आला नाही. आफ्रिकेचे हे दुखणे आजचे नाही. याचाही इतिहास आहे. हा भेदभावाचा इतिहास पुसायचा असेल आणि आफ्रिकेच्या वाळवंटात क्रिकेटची हिरवळ पुन्हा फुलवायची असेल तर आफ्रिकेने विश्वचषक जिंकायलाच हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -