मुंबई (प्रतिनिधी) : मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-ट्वेन्टी आणि दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या मालिकेसाठी नवा टी-ट्वेन्टी कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड झाली.
विद्यमान कर्णधार विराट कोहलीने टी-ट्वेन्टी संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा यूएईत सुरू असलेल्या वर्ल्डकपपूर्वी केली होती. त्यामुळे विद्यमान उपकर्णधार रोहित हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. टी-ट्वेन्टी मालिकेत उपकर्णधारपदाची धुरा सलामीवीर लोकेश राहुलकडे सोपवण्यात आली आहे.
आयपीएल गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत १६ सामन्यात एकूण ६३५ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजची नाबाद १०१ ही सर्वोत्तम खेळी आहे. या स्पर्धेत ऋतुराजने ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले होते. आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी तो ऑरेंज कॅपच मानकरी ठरला होता.
ऋतुराजसह श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युुझवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीसह हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यासारख्या सीनियर खेळाडूंना टी-ट्वेन्टी मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे.
न्यूझीलंड संघ १७ नोव्हेंबरपासून भारतात येत आहे. त्यात तीन टी-ट्वेन्टी आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी-ट्वेन्टी सामने होतील. दोन कसोटी सामने कानपूर आणि मुंबईमध्ये रंगतील. न्यूझीलंड संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी कमी अवधी उरला आहे. कोरोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. बीसीसीआयला आयपीएल आणि वर्ल्डकपचे आयोजनही यूएईत करावे लागले.