नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. अनेकांची नावे यासंदर्भात जोडली जात आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज नवनवे आरोप करत अनेकांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
‘ड्रग्ज या राज्यात यायला नकोत, भावी पिढी त्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करणे आणि ड्रग्ज संबंधित लोकांना तुरुंगात टाकणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकार हे करताना दिसत नाही. ड्रग्ज प्रकरणात फक्त आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. पण राज्यात ड्रग्ज येणे बंद होण्यासाठी आम्ही मोहीम सुरू करू, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत? त्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे. पोलिसांना त्यासाठी कामाला लावले पाहिजे. पोलिसांना तुम्ही वसुलीसाठी वापरता, मग ड्रग्ज राज्यात येत आहेत त्याला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर का करीत नाही?’, असा सवालही नारायण राणे यांनी केला आहे.
तसेच, ‘कोरोना हाताळायला देखील राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे यावर उपाय केले पाहिजेत. फक्त नरेंद्र मोदींवर टीका करून काही भागणार नाही. नरेंद्र मोदी हे उत्तम प्रकारे देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हे सरकार त्याबाबत काय करत आहे? सरकारमधले मंत्री फक्त लपाछपी खेळत आहेत’, असा हल्लाबोल देखील नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केला.