Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडापाकला उपांत्य फेरीचा सर्वाधिक अनुभव

पाकला उपांत्य फेरीचा सर्वाधिक अनुभव

नऊ वर्षांनंतर फायनल प्रवेशाची संधी

मुंबई (प्रतिनिधी) : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळल्या जात असलेल्या सातव्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या आवृत्तीचा (२००७)विजेता भारताचा संघ सेमीफायनलमध्ये नसला तरी पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०) या माजी विजेत्यांनी अंतिम चार संघांत स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनेही दावेदारी पेश केली आहे. त्यात सेमीफायनल खेळण्याचा सर्वाधिक अनुभव पाकिस्तानकडे आहे. त्यांनी पाचव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तानला नऊ वर्षांनंतर फायनलमध्ये धडक मारण्याची संधी आहे.

२०२१ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या सामन्यात, १० नोव्हेंबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दुसऱ्या सामन्यात, ११ नोव्हेंबरला पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप उपांत्य फेरीत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव पाकिस्तानकडे आहे. त्यांनी कमालीचे सातत्य राखताना २००७, २००९, २०१० आणि २०१२ अशा सलग चार स्पर्धांत अंतिम संघात स्थान पटकावले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारल्याने पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, सलग दुसऱ्या खेपेस फायनल प्रवेश करताना ट्रॉफी उंचावली. त्यावेळी युनुस खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवले. सुरुवातीच्या दोन हंगामात उपविजेतेपद आणि विजेतेपद पटकावल्यानंतरही पाकिस्तान संघाने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे.

सुपर-१२ फेरीत गटवार साखळीत पाचही सामने जिंकणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे. त्यामुळे अंतिम फेरीत खेळण्यासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानसमोर न्यूझीलंड आहे. सुपर-१२ फेरीत एकाच गटात (ग्रुप २) असल्याने दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी पाकिस्तानने विजय मिळवला आहे. किवींचा संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या खेपेस सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. २००७ आणि २०१६ मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. न्यूझीलंड संघ तिसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरी गाठणार का, याची उत्सुकता आहे.


यंदाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत.


पाकिस्तानप्रमाणे इंग्लंडही माजी विजेता आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१० वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर २०१६मध्ये त्यांनी फायनल प्रवेश केला होता. परंतु, वेस्ट इंडिजने बाजी मारताना त्यांना दुसऱ्या जेतेपदापासून रोखले. मागील दोन्ही खेपेस इंग्लिश संघाने उपांत्य फेरीचा अडथळा पार केला आहे. त्यामुळे कांगारूंविरुद्ध त्यांच्या कामगिरीची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलिया हा वनडे वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी तब्बल पाच वेळा ५० षटकांच्या वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. त्यात १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ या जेतेपदांचा समावेश आहे. त्यात सलग तीन जेतेपदांचा समावेश आहे. मात्र, कांगारूंना अद्याप टी-ट्वेन्टी वर्ल्डकपवर नाव कोरता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाने २००७, २०१० आणि २०१२मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यात २०१०मध्ये फायनल प्रवेश केला. मात्र, इंग्लंडकडून मात खावी लागली. ११ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -