मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुक्त झालेल्या लोकांची कार्यक्षमता ८२ टक्क्यांपर्यंत घटल्याचं काही प्रकरणांमध्ये आढळलं आहे. ८२ टक्के लोकांना थकवा येतो. संशोधनात असे ६० टक्के लोक आढळले, ज्यांना अजूनही डोकेदुखीची समस्या सतावते.
कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या लोकांमध्ये ‘लाँग कोविड’ची समस्या भयावह रूप धारण करत असून त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही कमी झाली आहे. लाँग कोविड म्हणजे ज्या परिस्थितीत ती व्यक्ती कोविड संसर्गातून बरी झाली आहे, त्याचा आरटीपीसीआर अहवालही निगेटिव्ह आला आहे. वैद्यकीय भाषेत याला पोस्ट ऍक्यूट कोविड-१९ सिंड्रोम असंही म्हणतात. अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल अँड रिहॅबिलिटेशन मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रुग्णालयात दाखल कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर एक वर्षानंतरही पूर्णवेळ काम करण्यास अपयशी ठरतात.
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांशी संबंधित एका नवीन अभ्यासात धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२१ दरम्यान केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच वेळ लागला. अभ्यासानुसार, कोरोनामधून बरं झाल्यानंतर एक वर्षानंतरही ८२ टक्के लोकांना शारीरिक थकव्याची समस्या होती तर ६७ टक्के लोकांना ब्रेन फॉगच्या समस्येचा सामना करावा लागला. ६० टक्के लोकांमध्ये अजूनही डोकेदुखीची समस्या आहे. ५९ टक्के लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या होती आणि ५४ टक्के लोकांना वर्षभर नियमित चक्कर येत होती.
या संशोधनात, प्रथम वास्तविक हानी आणि सिंड्रोमच्या परिणामांचं मूल्यांकन केलं गेलं. यासोबतच त्यांच्या घटकांचाही सखोल अभ्यास करण्यात आला, ज्यामुळे ही लक्षणं वाढू शकतात. कोरोनाग्रस्त अमेरिकेतल्या ओरेगॉन प्रांतातल्या ऍलेक्स कॅस्ट्रो यांना २९९ दिवस रुग्णालयात राहावं लागलं. या काळात लाँग कोविडचा रुग्ण असलेल्या ऍलेक्सला १०८ दिवस लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. आयसीयू नर्सच्या म्हणण्यानुसार ऍलेक्सने उपचारादरम्यान त्यांच्या इच्छाशक्तीमुळे साथीच्या रोगावर मात केली.