Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआयसीयूतील मृत्यू; हयगय कुणाची?

आयसीयूतील मृत्यू; हयगय कुणाची?

दिवाळी म्हणजे दिव्यांनी आसमंत उजळवून टाकणारा सण. त्याचसोबत मनातील अंधार दूर करून सकारात्मक विचार करायला लावणारा सण. साहजिकच सणासुदीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) लागलेल्या भीषण आगीमध्ये दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ऐन दिवाळीत या मृत तसेच जखमींच्या कुटुंबावर शोककळा पसरली. कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान काळाचा घाला पडण्याची ही पहिली घटना नक्कीच नाही. कोरोना काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये उपचारासाठी आलेल्या शेकडो निष्पापांचे बळी गेले आहेत. घटना घडल्यानंतर केंद्र तसेच राज्य सरकारकडून मृतांच्या परिवाराला आर्थिक मदत दिली जाते. दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले जाते. सत्ताधारी कालांतराने सर्वकाही विसरून जातात. अशा घटना घडू नयेत यासाठी मात्र काळजी घेतली जात नाही किंवा तशा उपाययोजना देखील केल्या जात नाहीत.

नगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली. घटना घडली तेव्हा तिथे १७ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर सात जण भाजून जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते, असेही जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २०२१ वर्षात म्हणजे गेल्या दहा महिन्यांत सहा प्रमुख घटनांनी राज्य हादरले. याची सुरुवात जानेवारीमध्ये झाली. त्यानंतर उर्वरित चारपैकी तीन घटना एप्रिल महिन्यातील आहेत. ९ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली होती. नवजात शिशूंसाठीच्या विशेष अतिदक्षता विभागात, म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागली. एकूण १७ बालकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यापैकी ७ बालकांना अग्निशमन दलाकडून वाचवण्यात आले. २६ मार्च रोजी घडलेल्या घटनेत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री बारा वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत कोविड रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ९ एप्रिल रोजी नागपूर शहरातील वाडी येथील वेल्ट्रिट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागली. सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले होते. मात्र या आगीत ४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २४ जणांचा प्राण गमवावे लागले. टँकरमध्ये गळती झाल्याने ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. एप्रिल महिन्यातील तिसऱ्या घटनेत, २३ एप्रिल रोजी विरार, पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मध्यरात्री भीषण आग लागली असून यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी १३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मात्र, पुढील तपासात रुग्णालयात अग्निसुरक्षेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. भांडुप येथील दुर्घटनेनंतर राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरू असलेल्या रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी तत्काळ करण्याचे निर्देशही दिले होते. तरीही त्याची कार्यवाही झालेली झाली. नगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पण पुढे काय? राज्य सरकार केवळ चौकशीचे आदेश देणार. त्याची कार्यवाही होते की नाही, हे कोण पाहणार?

जुन्या घटनांची आठवण नेहमीच दिली जाते. मात्र, त्यातून काही तरी बोध घ्यायला हवा. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे मध्यरात्री त्या रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात मध्यरात्री आग लागली. मात्र, त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकांनी प्रसंगावधान राखून धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता ९ नवजात शिशूंना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले होते. हे सर्व शिशू १ ते १५ दिवसांमधील होते. २८ सप्टेंबर २०२० रोजी कोल्हापूर जिल्हा रुग्णालय सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) येथील ट्रामा केअर विभागामध्ये पहाटे आग लागली. या वॉर्डमध्ये १६ रुग्ण होते. त्यांना तातडीने इतरत्र हलविण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. २१ नोव्हेंबर २०२० रोजी नायर रुग्णालयाच्या ओपीडी विभाग असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रिक्ट डक्टमध्ये संध्याकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच ३ फायर इंजिन, २ जेट, एडीएफओ रुग्णालयाच्या दिशेला रवाना झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

१३ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईतील मुलुंड येथील अॅपेक्स रुग्णालयात सोमवारी सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत रुग्णालयातील सर्वच्या सर्व ४० रुग्णांना तातडीने जवळच्या अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आगीच्या वाढत्या घटना पाहता रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थापनात ‘हयगय’ करणाऱ्यांच्या विरोधात आता स्वतंत्र एक कायदा करायला हवा. त्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित केली जावी. शेवटी मोठ्या आत्मविश्वासाने रुग्ण ह्या रुग्णालयात उपचार घेण्याकरिता दाखल होत असतो. त्याच्या जीवाची काळजी रुग्णालयातील प्रशासनाने घेतलीच पाहिजे. त्याशिवाय रुग्णालयाने अशा दुर्घटना घडल्यास रुग्णांना मदत करता यावी याकरिता विमा काढून ठेवला पाहिजे. या अशा पद्धतीने दुर्घटना घडत असल्याने निष्पाप जीवाचे बळी जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -